एकाच कानानं ऐकू येणारा खेळाडू, लिलावात मिळाले तब्बल ३ कोटी २० लाख

आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठीचा लिलाव संपला आहे.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Jan 28, 2018, 05:42 PM IST
एकाच कानानं ऐकू येणारा खेळाडू, लिलावात मिळाले तब्बल ३ कोटी २० लाख  title=

बंगळुरू : आयपीएलच्या अकराव्या मोसमासाठीचा लिलाव संपला आहे. तब्बल दोन दिवस चालणाऱ्या या लिलावामध्ये अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला तर काही दिग्गज खेळाडूंना झटकाही बसला आहे. यंदाच्या लिलावामध्ये नवोदित खेळाडूंना मोठी रक्कम मिळाल्याचं पाहायला मिळालं. यातलाच एक नवोदित म्हणजे वॉशिंग्टन सुंदर.

वॉशिंग्टन सुंदर यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणार आहे. वॉशिंग्टन सुंदरला एका कानानंच ऐकू येतं. लहानपणापासूनच वॉशिंग्टन सुंदरला ही समस्या आहे. वॉशिंग्टन सुंदर ४ वर्षांचा असताना त्याच्या घरच्यांना याबाबत कळलं होतं. यानंतर अनेक डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले पण कानावर अजून कोणताही इलाज झालेला नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा ७वा लहान भारतीय

श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे सीरिजमधून सुंदरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. भारताकडून क्रिकेट खेळणारा सुंदर हा ७वा लहान खेळाडू बनला आहे.

भारताकडून सगळ्यात लहान वयामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनं पदार्पण केलं होतं. सचिननं १६ वर्ष आणि २३८ दिवसांचा असताना पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळली. तर दुसऱ्या क्रमांकावर मनिंदर सिंग आहेत. मनिंदर सिंग यांनी १७ वर्ष २२२ दिवसांचे असताना पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळली. यानंतर हरभजन सिंगनं १७ वर्ष २८८ दिवसांचा असताना पहिली मॅच खेळली.

पार्थिव पटेल(१७ वर्ष ३०१ दिवस), लक्ष्मी शुक्ला(१७ वर्ष ३२० दिवस) आणि चेतन शर्मा(१७ वर्ष ३३८ दिवस) हे भारताकडून खेळलेले सगळ्यात लहान खेळाडू आहेत. वॉशिंग्टन सुंदर भारताकडून वनडे क्रिकेट खेळणारा २२०वा खेळाडू आहे.

आयपीएल १० मध्येही उत्तम प्रदर्शन

आयपीएलच्या मागच्या सिझनमध्येही वॉशिंग्टन सुंदरनं उल्लेखनीय कामगिरी केली होती. पुणे सुपरजायंट्सच्या टीमला फायनलमध्ये पोहोचवण्यात वॉशिंग्टन सुंदरचं मोलाचं योगदान होतं.