कोलकाता : २०२० साठीच्या आयपीएलचा लिलाव कोलकात्यामध्ये पार पडला. या लिलावात अनेक खेळाडू कोट्यधीश झाले, तर काहींच्या पदरी निराशा पडली.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच याने या लिलावात वेगळ्याच विक्रमाची नोंद केली आहे. एरॉन फिंचला बंगळुरुने ४.४० कोटी रुपयांना विकत घेतलं. आयपीएलमधली एरॉन फिंचची ही आठवी टीम आहे. आयपीएलमध्ये ८ टीमकडून खेळणारा एरॉन फिंच हा एकमेव खेळाडू आहे.
२०१० साली एरॉन फिंचने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत एरॉन फिंच प्रत्येकवेळी वेगवेगळ्या टीमकडून खेळला आहे. २०१२ आणि २०१९ साली एरॉन फिंच आयपीएल खेळला नव्हता.
२०१० साली फिंच पहिल्यांदा आयपीएल खेळला तेव्हा राजस्थानच्या टीमने त्याला विकत घेतलं होतं. यानंतर २०११ साली फिंच दिल्लीकडून, २०१३ साली पुण्याकडून आणि २०१४ साली हैदरबादकडून खेळला. २०१५ साली मुंबईने फिंचला टीममध्ये घेतलं होतं. २०१६ साली तो गुजरातकडून आणि २०१८ साली पंजाबकडून खेळला.
एरॉन फिंचने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ७५ मॅचमध्ये २६.३१ च्या सरासरीने १,७३७ रन केले आहेत. आयपीएलमध्ये फिंचने १३ अर्धशतकं केली आहेत, पण त्याला एकही शतक करता आलेलं नाही.