हैदराबाद : २०१९ च्या आयपीएलमध्ये रोहित शर्माची मुंबई चॅम्पियन ठरली. अत्यंत रोमांचक अशा फायनलमध्ये मुंबईने चेन्नईचा शेवटच्या बॉलवर १ रननी पराभव केला. मुंबईने चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. मुख्य म्हणजे या चारही ट्रॉफी मुंबईने रोहित शर्माच्याच नेतृत्वात पटकावल्या आहेत. आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या १२ मोसमांमध्ये एवढ्या ट्रॉफी कोणत्याही टीमला मिळवता आलेल्या नाहीत.
२०१९ साली विजय मिळवणाऱ्या मुंबईची २०१८ सालची कामगिरी निराशाजनक राहिली होती. मागच्या मोसमात मुंबई पाचव्या क्रमांकावर राहिली. मागचा मोसम आणि हा मोसम यातला प्रवास सांगताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला.
२० मे २०१८ साली दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात मुंबईच्या टीमचं प्लेऑफमध्ये जायचं स्वप्न भंगलं होतं. त्या मॅचमध्ये मुंबईचा ११ रननी पराभव झाला होता. दिल्लीविरुद्धची ती मॅच मुंबई जिंकली असती, तर ते प्ले ऑफमध्ये पोहोचले असते. पण याच टीमने १२ मे २०१९ साली इतिहास घडवला. मागच्या मोसमानंतर प्रत्येकाने टीमच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले, पण कर्णधार रोहित शर्माने टीमवर विश्वास ठेवला. कठीण काळ असताना रोहितने दाखवलेल्या विश्वासामुळे खेळाडूंचा विश्वास वाढला आणि मुंबईने चौथ्यांदा आयपीएल जिंकली.
'मागच्या वर्षी दिल्लीविरुद्ध झालेल्या पराभवामुळे आम्ही प्लेऑफमध्ये पोहोचलो नव्हतो, पण ही टीम शानदार असल्याचं मी तेव्हाही म्हणालो होतो. २०१८ सालची कामगिरी आमच्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही. पण टीम चमत्कार करेल, असा मला भरवसा होता. आज आम्ही स्वत:ला सिद्ध केलं आहे. हीच आमच्या टीमची ओळख आहे. आम्ही शेवटपर्यंत सगळ्यांवर विश्वास ठेवला. प्रत्येकाने या मोसमात जबरदस्त खेळ केला, यामुळे आयपीएल ट्रॉफी उचलण्याची संधी मला मिळाली. यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद. खेळाडू, सपोर्ट स्टाफ, टीम प्रशासन आणि प्रत्येक जण जो आमच्यासोबत राहिला त्यांचे धन्यवाद', असं भावनिक वक्तव्य रोहित शर्माने केलं.