मुंबई : दोन नवीन संघ लवकरच आयपीएलमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे जगातील सर्वात मोठी टी -20 क्रिकेट लीगची मजा दुप्पट होणार आहे. पुढील वर्षी दोन नवीन संघांची भर पडणार असून आयपीएलमध्ये 10 संघांमध्ये स्पर्धा होणार आहे. परंतु या दोन नवीन संघांची किंमत अनेकांच्या भुवया उंचवू शकते.
आयपीएल 2022 च्या हंगामावर जगाची नजर असणार आहे. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय आयपीएल 14 च्या दुसर्या टप्प्यापूर्वी दोन संघांचा समावेश करण्यात व्यस्त आहे. अहवालानुसार, जुलैमध्ये दोन नवीन संघांवर निर्णय होईल.
आयपीएलमध्ये सध्या 8 संघ आहेत. ज्यामध्ये सीएसके, मुंबई, केकेआर आणि आरसीबी हे 4 सर्वात महागडे संघ आहेत. मुंबईची किंमत 2700 ते 2800 कोटी आहे, तर सीएसकेची किंमत 2200 ते 2300 कोटी आहे. क्रिकबझच्या मते, नवीन फ्रँचायझीची बेस किंमत सुमारे 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 1800 कोटी रुपये असू शकते. तर त्यांची अंतिम किंमत 2200-2900 कोटी रुपये असेल
2021 पर्यंत 8 संघांमध्ये आयपीएलचं आयोजन होतं होतं. त्यामुळे आता नवीन संघांच्या समावेशाचा काय परिणाम होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आयपीएल 2022 मध्येही मोठा लिलाव होईल, ज्यात संघांना वेगवेगळे खेळाडू संघात घेता येतील. सध्या बीसीसीआयचे लक्ष्य यंदाच्या आयपीएलच्या मोसमातील राहिलेले सामने आयोजित करण्याचे आहे. आयपीएलचे एकूण 31 सामने युएईमध्ये खेळले जाणार आहेत. कोरोनामुळे स्पर्धा मे मध्ये तहकूब करण्यात आली होती. आता पुन्हा सप्टेंबरमध्ये याची सुरूवात होईल.