लंडन : आयपीएलमध्ये कोणत्याही टीमनं विकत न घेतलेल्या ईशांत शर्मानं काऊंटी क्रिकेटच्या पहिल्या मॅचमध्ये पाच विकेट घेतल्या. यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये ईशांतनं त्याच्या बॅटनं कमाल दाखवली. या मॅचमध्ये ईशांतनं त्याच्या कारकिर्दीमधलं पहिलं अर्धशतक केलं. ससेक्सकडून खेळणाऱ्या ईशांतनं लीस्टरशरविरुद्ध खेळताना पहिल्या इनिंगमध्ये ६६ रन केले. क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये ईशांतचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी प्रथम श्रेणी क्रिकेट आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये ईशांतचा सर्वाधिक स्कोअर ३१ रन होता. सहा रनवर तीन विकेट गमावल्यामुळे ससेक्सचा स्कोअर २४०/७ एवढा झाला होता. यानंतर बॅटिंगला आलेल्या ईशांतनं मायकल बर्गेससोबत आठव्या विकेटसाठी १५३ रनची पार्टनरशीप केली. ईशांत शर्मानं तीन तासांपेक्षा जास्तवेळ बॅटिंग केली आणि १४१ बॉलचा सामना केला.
भारताच्या इंग्लंड दौऱ्याआधी फास्ट बॉलर इंग्लंडमध्ये जाऊन काऊंटी क्रिकेट खेळणार का नाही असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. सुरुवातीला नकार देणारा ईशांत शर्मा अखेर काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी तयार झाला. आयपीएलच्या लिलावावेळी कोणत्याही टीमनं विकत न घेणं हेदेखील सुरुवातीला काऊंटी न खेळण्याचं कारण होतं. शेवटी ईशांत शर्मानं काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी ससेक्सबरोबर करार केला. जोफ्रा आर्चर आणि क्रिस जॉर्डन उपस्थित नसल्यामुळे ईशांतला ससेक्सच्या टीममध्ये संधी मिळाली. जोफ्रा आर्चर आणि क्रिस जॉर्डन सध्या आयपीएल खेळत आहेत.
ईशांत शर्माचा ससेक्ससोबत २ महिन्यांचा करार झाला आहे. पण ईशांतनं अशाचप्रकारे शानदार कामगिरी केली तर त्याचा करार वाढवण्यात येऊ शकतो.
ईशांत शर्माबरोबरच चेतेश्वर पुजारालाही आयपीएलमध्ये कोणत्याच टीमनं विकत घेतलं नाही. त्यामुळे पुजाराही काऊंटी खेळायला गेला आहे. आयपीएल संपल्यावर विराट कोहलीही इंग्लंडमध्ये जाऊन काऊंटी खेळणार आहे. आयपीएलनंतर भारताचे इतर खेळाडूही इंग्लंडमध्ये जातील असं बीसीसीआयनं सांगितलं आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारत एकही सराव सामना खेळला नाही. दक्षिण आफ्रिकेतल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला. पुरेसा सराव न मिळाल्यामुळे भारताचा पराभव झाल्याची टीका यावेळी झाली होती. दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेली ही चूक सुधारण्यासाठी भारतीय टीममधले खेळाडू आधीच इंग्लंडमध्ये जाऊन सराव करत आहेत.