मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज जिंकल्यानंतर भारतीय टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ५ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहेत. पण न्यूझीलंडला रवाना होण्याआधीच टीम इंडियाला धक्का लागला आहे. अनुभवी फास्ट बॉलर इशांत शर्माच्या पायाला दुखापत झाली आहे. दिल्ली आणि विदर्भात सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी मॅचवेळी इशांतला दुखापत झाली आहे.
इशांतची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अजून माहिती मिळू शकली नाही, पण टीम सहकाऱ्याच्या मदतीने इशांत शर्मा मैदानाबाहेर गेला. विदर्भाच्या दुसऱ्या इनिंगच्या पाचव्या ओव्हरला इशांतला दुखापत झाली. विदर्भाचा कर्णधार फैज फैजलला बॉलिंग टाकताना इशांत शर्मा घसरला आणि त्याच्या पावलाला दुखापत झाली.
३१ वर्षांच्या इशांत शर्माने पहिल्या इनिंगमध्ये ४५ रन देऊन ३ विकेट घेतल्या होत्या. इशांत शर्माची या रणजी मोसमातली ही शेवटची मॅच होती. न्यूझीलंड दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजसाठी इशांतची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. पण दुखापत गंभीर असेल तर मात्र इशांतला न्यूझीलंड दौऱ्याला मुकावं लागू शकतं. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टेस्ट सीरिज २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
पहिली टेस्ट- २१ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी- वेलिंग्टन
दुसरी टेस्ट- २९ फेब्रुवारी ते ४ मार्च- क्राईस्टचर्च