Pulwama Attack : ... तर २०१९च्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानशी खेळणार नाही

बीसीसीयाच्या सुत्रांकडून मिळाली माहिती 

Updated: Feb 20, 2019, 12:01 PM IST
Pulwama Attack : ... तर २०१९च्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानशी खेळणार नाही

मुंबई : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणाऱे संबंध दिवसेंदिवस आणखी बिघडताना दिसत आहेत. जम्मू- काश्मीर परिसरात झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर हे वातावरण आणखी चिघळलं आणि त्याचे थेट पडसाद क्रीडा व कला क्षेत्रावरही पाहायला मिळाले. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या क्रिकेट विश्चचषकावरही याचे परिणाम पाहायला मिळत आहेत. इंग्लंडमध्ये ३० मे पासून सुरू होणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यांवर याचे थेट पडसाद पाहायला मिळत आहेत. 

पाकिस्तानच्या संघासोबत न खेळण्याचा निर्णय भारतीय सरकारकडून देण्यात आला तर भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानच्या संघाविरुद्ध खेळणार नाही अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिल्याचं वृत्तं 'एएनआय'ने प्रसिद्ध केलं आहे. 'याविषयीचं चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. आयसीसीचा याच्याशी फार संबंध नाही. पण, जर आमच्या (भारत) सरकारला भारतीय संघाने पाकिस्तानी संघाशी खेळणं योग्य वाटत नसेल तर, सहाजिकच आम्ही खेळणार नाही', अशी माहिती  सूत्रांनी दिली. 

मुख्य म्हणजे या खेळातील काही आकडेमोडही स्पष्ट करत सूत्रांनी वस्तूस्थितीही समोर ठेवली आहे. पाकिस्तानच्या संघाशी सामना झाला नाही तरीही त्यांना गुण मिळणार. त्यातही अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान अशी चुरस रंगणार असली आणि भारतीय संघ यात खेळला नाही तर पाकिस्तान न खेळताच विजेता संघ ठरेल, अशी अतिशय महत्त्वाची माहिती सूत्रांकडून देण्याता आली आहे. ही एकंदर परिस्थिती पाहता आता पुढचा निर्णय काय असणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान, 'एएनआय'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमधील सामन्यांविषयीचा मुद्दा २७ फेब्रुवारी रोजी दुबईत होणाऱ्या आयसीसीच्या सभेत उचलला जाण्याची शक्यता आहे.