नागपूर : पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेनेही जामठा स्टेडियमवर लावण्यात आलेले पाकिस्तान क्रिकेटपटूंचे फोटो हटविले आहे. स्टेडियममधील प्रेस बॉक्स आणि अन्य ठिकाणी लावण्यात आलेले पाकिस्तान क्रिकेटपटू आणि विश्वचषक विजेत्या पाकिस्तान संघाचे फोटो काढून टाकण्यात आले आहे. पाकिस्तानचा पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान, जावेद मियांदाद आणि संघाचे संघाचे फोटो हे स्टेडियमवरुन हटवण्यात आले आहे. विदर्भ क्रिकेट संघानं इराणी करंडकर जिंकल्यानंतर पुरस्काराची रक्कमही सीआरपीएफच्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून दिली आहे.
कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनने देखील या घटनेची निंदा करत चिन्नास्वामी स्टेडिअमवरुन पाकिस्तानच्या खेळाडूंचे फोटो काढून टाकले आहेत. असोसिएशनने म्हटलं की, 'सीआरपीएफ जवानांना आपलं समर्थन दर्शवण्यासाठी आणि पुलवामा हल्ल्याविरुद्ध आपला विरोध दर्शवण्यासाठी आम्ही इम्रान खानसह सगळ्या पाकिस्तानच्या खेळाडूंचे फोटो काढून टाकले आहेत.'
याआधी सगळ्यात आधी क्रिकेट क्लब इंडियाने देखील इम्रान खानचे सर्व फोटो झाकले होते. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ, पंतप्रधान इम्रान खान, शोएब मलिक, शोएब अख्तर यांचे फोटो होते. याआधी पंजाब आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनने देखील पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंचे फोटो हटवले आहेत.