ऑलिम्पिकपूर्वी टोकियोत 'व्हायरस इमर्जन्सी, प्रेक्षकांशिवाय होणार स्पर्धा

टोकियोमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याची नोंद होत असल्याने जपानच्या पंतप्रधानांनी घेतला निर्णय

Updated: Jul 8, 2021, 06:40 PM IST
ऑलिम्पिकपूर्वी टोकियोत 'व्हायरस इमर्जन्सी, प्रेक्षकांशिवाय होणार स्पर्धा title=

मुंबई : जपानची राजधानी टोकियोत येत्या 23 जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. पण त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून टोकियोमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जपानच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 

12 जुलै ते 22 ऑगस्टदरम्यान टोकियो शहरात आणीबाणीची स्थिती लागू होईल. बुधवारी तज्ज्ञांशी झालेल्या बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांनी येत्या सोमवार ते 22 ऑगस्टदरम्यान टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव दिला होता. 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. पण आणीबाणीच्या परिस्थितीतच ऑलिम्पिक खेळांचं आयोजन होणार असून स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना मैदानात हजर राहण्याची परवानगी मिळणार नाही.

2020 होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली होती. सध्या कोरोनाचं संकट कमी झालं असलं तरी पूर्णपणे संपलेलं नाही. या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. सध्याच्या घडीला टोकियोत कोरोनासंदर्भात कठोर नियम लागू नाहीत. त्यामुळे शहरातील कोरोनाचा आकडा वाढताना दिसतोय. 

जपानमध्ये कोरोनाचा पुन्हा कहर

गेल्या 19 दिवसांपासून टोकियोमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या एका आठवड्यात टोकियोमध्ये दररोज सरासरी 663 रुग्ण आढळले आहेत, बुधवारी टोकियोमध्ये कोरोनाचे 920 रुग्ण आढळले होते. 13 मे नंतर एकाच दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. इतकेच नाही तर बुधवारी टोकियोमध्ये कोरोना विषाणूमुळे दोन मृत्यूही झाले आहेत.