'व्हाईट वॉश' विजयात बुमराहचा विक्रम, सगळेच विसरले!

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा ५-०ने विजय झाला आहे.

Updated: Feb 3, 2020, 07:56 PM IST
'व्हाईट वॉश' विजयात बुमराहचा विक्रम, सगळेच विसरले! title=

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा ५-०ने विजय झाला आहे. टी-२० सीरिज ५-०च्या अंतराने जिंकणारी भारतीय टीम ही जगातली पहिलीच ठरली आहे. तसंच न्यूझीलंडमध्ये भारताने पहिल्यांदाच टी-२० सीरिज जिंकण्याचा विक्रमही केला आहे. पण याच मॅचमध्ये भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहने अनोखं रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केलं आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम बुमराहने केला आहे. 

या सीरिजच्या सुरुवातीच्या काही मॅचमध्ये बुमराहने जास्त रन दिल्या, पण चौथ्या मॅचपासून त्याने जोरदार पुनरागमन केलं. पाचव्या टी-२० मॅचमध्ये तर बुमराहला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. बुमराहने ४ ओव्हरमध्ये १२ रन देऊन ३ विकेट घेतल्या, यामध्ये बुमराहने एक ओव्हर मेडनही टाकली.

जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७ मेडन ओव्हर टाकल्या आहेत. सर्वाधिक मेडन टाकण्याच्या बाबतीत बुमराहने श्रीलंकेच्या नुवान कुलसेकराचा विक्रम मोडीत काढला. कुलसेकराने आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ६ ओव्हर मेडन टाकल्या होत्या. हरभजन सिंग, मोहम्मद आमीर, अजंता मेंडिस, मोहम्मद नईब यांनी टी-२० क्रिकेटमध्ये ५ मेडन ओव्हर टाकल्या.