मुंबई : बांग्लादेशविरुद्धच्या टी-20 ट्रायसीरिज फायनलमध्ये भारताचा सनसनाटी विजय झाला. दिनेश कार्तिक हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. शेवटच्या बॉलला ५ रन्सची आवश्यकता असताना दिनेश कार्तिकनं सिक्स मारून भारताला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकनं ८ बॉल्समध्ये २९ रन्सची स्फोटक खेळी केली. कार्तिकच्या या इनिंगमध्ये ३ सिक्स आणि २ फोरचा समावेश होता.
शेवटच्या बॉलवर सिक्स मारून टीमला जिंकवून देणारा कार्तिक हा पहिला खेळाडू नाही. कार्तिकच्या आधी पाकिस्तानचा खेळाडू जावेद मियादाद यांनीही भारताविरुद्ध सिक्स मारून पाकिस्तानला विजय मिळवून दिला. १९८६ साली जावेद मियादादनं चेतन शर्माला शेवटच्या बॉलवर सिक्स मारून पाकिस्तानला जिंकवलं. या मॅचमध्ये पाकिस्तानला विजयासाठी २४६ रन्सनं आव्हान भारतानं दिलं होतं. शेवटच्या बॉलला ४ रन्सची आवश्यकता असताना मियादानं शर्माला सिक्स मारली.
जावेद मियादाद यांना मात्र दिनेश कार्तिकनं शेवटच्या बॉलला मारलेली सिक्स पचलेली दिसत नाही. ज्या मैदानात ही मॅच खेळवण्यात आली त्याची बाऊंड्री लाईन किती लांब होती, असा सवाल मियादाद यांनी विचारला आहे.
आधुनिक क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलवर सिक्स मारणं एवढं कठीण नाही. मी मारलेल्या सिक्सची तुलना दुसऱ्या बॅट्समनशी केली जाते. पण तेव्हा शेवटच्या बॉलवर सिक्स मारणं खूप कठीण होतं. कोणताही बॅट्समन तेव्हा याबाबत विचारही करु शकत नव्हता, असं मियादाद म्हणाले आहेत. टी-20 क्रिकेटमुळे पावर हिटींग सोपी झाली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये ३० रन्स बनवणंही आता संभव आहे, असं मियादाद यांना वाटतंय.