10 सामन्यांमध्ये 67 विकेट्स घेणाऱ्या बॉलरची निराशा! टीम इंडियाचे दरवाजे बंद?

या बॉलरचं टीम इंडियामधून खेळण्याचं स्वप्न अपूर्णच राहणार... सौराष्ट्रच्या माजी कोचनी दिलं उत्तर

Updated: May 27, 2021, 02:55 PM IST
10 सामन्यांमध्ये 67 विकेट्स घेणाऱ्या बॉलरची निराशा! टीम इंडियाचे दरवाजे बंद? title=

मुंबई: टीम इंडियामध्ये निवड व्हावी असं स्वप्न प्रत्येक खेळाडूचं असतं. यासाठी प्रत्येक खेळाडू दिवसरात्र मेहनत करून जीवाचं रान करत असतो. मात्र एका गोलंदाजाचं हे स्वप्न बहुतेक स्वप्नच राहणार असं सध्या दिसत आहे. या गोलंदाजाला टीम इंडियामधून खेळण्याची संधी अगदीच धूसर दिसत आहे. यासंदर्भात सौराष्ट्रचे माजी कोच यांनी देखील मोठं विधान केलं आहे. 

डाव्या हाताने खेळणारा वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट याचं टीम इंडियातून खेळण्याचं स्वप्न अधुरं राहण्याची शक्यता आहे. त्याची टीम इंडियात निवड होऊ शकत नाही असा दावा सौराष्ट्रचे माजी कोच करसन घावरी यांनी केला आहे. 

'टाइम्स ऑफ इंडिया'लाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार 2019-20 च्या रणजी हंगामात टीम इंडियाच्या निवड समितीने जयदेव उनाडकट कितीही चांगली कामगिरी केली असली तरी तो आता टीम इंडियामध्ये परत येणार नसल्याचे म्हटले होते. जयदेवचं वय जास्त असल्यामुळे त्याला टीम इंडियामध्ये घेतलं नाही. 

'मी 2019-20च्या रणजी ट्रॉफी अंतिम निवडीदरम्यान निवड करणाऱ्यांसोबत चर्चा केली त्यावेळी त्यांना विचारलं जो वेगवान गोलंदाज 60 हून अधिक विकेट्स घेतो त्याने जर टीमला रणजी ट्रॉफीपर्यंत पोहोचवलं तर त्याला टीम इंडियाच्या A टीममध्ये खेळण्याची संधी मिळेल का? त्यावर निवडकर्त्यांचं म्हणणं होतं की त्याला ही संधी मिळणं कठीण आहे. याचं कारण त्याचं वय जास्त आहे.' 

घावरी यांच्या म्हणण्यानुसार 'निवड करताना साधारण 21 ते 23 वर्ष वयोगटातील गोलंदाजांना प्राधान्य दिलं जातं. हे खेऴाडू किमान 8 ते 10 वर्ष टीम इंडियासाठी खेळतील अशापद्धतीनं त्यांची निवड केली जाते. त्यामुळे जयदेवला आता संघात घेऊन तो किती वर्ष खेळणार हा देखील निवडकर्त्यांसमोर एक प्रश्न आहेच.'

जयदेवने 2010 मध्ये 1 कसोटी सामना खेळला आहे. 2013 मध्ये 7 वन डे सामने खेळून 8 विकेट्स घेतल्या तर 10 टी 20 सामने खेळून 14 विकेट्स आपल्या नावावर करून घेतल्या आहेत. 84 आयपीएलचे सामने खेळून त्याने 85 विकेट्स घेतल्या आहेत.