मुंबई: टीम इंडिया 2 जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 18 ते 22 जून न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळल्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची टेस्ट सीरिज होणार आहे. या स्टेस्ट सीरिजआधी मोठी बातमी येत आहे. इंग्लंड संघातील स्टार खेळाडू या सीरिजमध्ये खेळणार नाही.
काउटी चॅम्पियनशिपदरम्यान इंग्लंडचा स्टार खेळाडू जोफ्रा आर्चरच्या हाताची दुखापत पुन्हा डोकं वर काढू लागल्यामुळे त्याने माघार घेतली. जोफ्रा आर्चरच्या हातावर दुसऱ्यांदा सर्जरी करण्यात आली आहे. IPL 2021मध्ये राजस्थान संघाकडून खेळत असताना जोफ्राच्या हाताची दुखापत वाढू लागली.
जोफ्राच्या हाताचे रिपोर्ट काढल्यानंतर त्यामध्ये काचेचा तुकडा गेल्याची माहिती मिळाली. तो काचेचा तुकडा शस्त्रक्रिया करून काढण्यात आला. मात्र त्यानंतरही हाताची दुखापत थांबली नाही. त्यामुळे जोफ्रावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
इंग्लंड सीरिजदरम्यानचे पहिले काही सामने जोफ्रा खेळणार नाही असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता संपूर्ण सीरिज जोफ्रा बाहेरच असेल असं इंग्लंड क्रिकेट बोर्डनं देखील स्पष्ट केलं आहे. जोफ्राच्या कोपरामध्ये दोन वेगवेगळ्या दुखापती झाल्यामुळे तो खेळू शकणार नाही. त्याच्या हातावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली आहे.
'आर्चरने डेली मेलला दिलेल्या वृत्तानुसार हाताच्या ऑपरेशननंतर मी एक निर्णय घेतला आहे की मी घाईत परत मैदानात उतरणार नाही. कारण माझे सर्व लक्ष या वर्षाच्या अखेरीस टी 20 विश्वचषक आणि इंग्लंडसाठी एशेसकडे असेल. मला यात खेळायचे आहे. हे माझे ध्येय आहे.' भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज 4 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे.