मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : रोहीत शर्मा श्रीलंकेविरूद्ध धावांचा पाऊस पाडत असतानाच मुंबईच्या क्रिकेट विश्वात ज्युनिअर रोहीत शर्मा धुमाकूळ घालत होता. हा ज्युनिअर रोहित म्हणजे 14 वर्षांखालील संघातला आयुष जेठवा... आयुषची कामगिरी पाहता रोहितचा वारसदार म्हणून त्याला मुंबई क्रिकेट वर्तुळात पाहिलं जातंय.
आयुष जेठवा... रोहित शर्मा ज्या शाळेत शिकला त्याच बोरीवलीतील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयुष जेठवा शिकतो. ज्या प्रशिक्षकांकडे रोहित शर्मानं क्रिकेटची बाराखडी गिरवली त्याच दिनेश लाड या यांच्याकडे आयुष क्रिकेटचे धडे गिरवतोय. फरक एवढाच आहे की रोहित हा उजव्या हातने बॅटींग करतो तर आयुष हा डाव्या हातानं बॅटींग करतो. मात्र, दोघेही ऑफ स्पिन टाकतात. रोहित वयाच्या बाराव्या वर्षी दिनेश लाड यांच्याकडे क्रिकेट शिकण्यासाठी आला. तर आयुषही जवळपास अकराव्या-बाराव्या वर्षी दिनेश लाड यांच्याकडे क्रिकेट शिकायला आला. आयुष दररोज तीन ते चार तास दिनेश लाड यांच्याकडे क्रिकेटचा सराव करतो. आयुषकडेही रोहितप्रमाणे तंत्रशुद्ध बॅटींग करण्याची गुणवत्ता आहे.
आयुष मुंबईच्या अंडर 14 टीमचा कॅप्टन आहे. 2017 मध्ये त्यानं जवळपास 13 सेंच्युरी झळकावल्या. असून गेल्या तीन महिन्यात तर त्यानं जवळपास हजार रन्स केल्या अूसन त्यानं या रन्स 150च्या सरासरीनं केल्या आहेत हे विशेष... गाईल्स शिल्ड, सीपीसीसी आणि डीएसओ स्पर्धांमध्ये त्यानं या रन्सची बरसात केलीय. गेल्या तीन महिन्यांमध्ये तर तो आपल्या कामगिरीच्या शिखरावर असून या कालावधीत त्यानं चार सेंच्युरी, तीन हाफ सेंच्युरी आणि एकदा डबल सेंच्युरी झळकावलीय. गेल्याच आठवड्यात त्यानं गाईल्स शिल्डमध्ये पार्ले टिळक या शाळेविरुद्ध 202 बॉल्समध्ये 242 रन्सची झुंजार खेळी केली. यामध्ये त्यानं तब्बल 34 फोर्स लगावले.
आयुषची गुणवत्ता पाहता त्याची तुलना आता रोहित शर्माबरोबर केली जातेय. यामुळे आयुषला अधिकच हुरुप येतोय आणि अधिक मेहनत करण्याची प्रेरणाही मिळते.
गेल्या दीड वर्षापासून आयुषच्या कामगिरीचा आलेख चांगलाच उंचावला असून बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये तर तो चांगली कामगिरी करतच आहे. याचबरोबर त्याच्यामध्ये नेतृत्वगुणही बहरत आहेत. शालेय आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या स्पर्धांमध्ये आयुष सध्या धमाका करत असून त्यांची खेळण्याची स्टाईल पाहता दिनेश लाड सरांकडे ज्युनिअर रोहित शर्मा घडत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगलीय.