मुंबई कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी खुशखर! हा स्टार क्रिकेटपटू होतोय रिकव्हर

3 डिसेंबरपासून मुंबईमध्ये न्यूझीलंड विरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरू होत आहे. या सामन्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी

Updated: Nov 30, 2021, 03:09 PM IST
मुंबई कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी खुशखर! हा स्टार क्रिकेटपटू होतोय रिकव्हर

मुंबई: कानपूरमधील पहिला कसोटी सामना अनिर्णयीत राहिला आहे. त्यानंतर आता सर्वांचं लक्ष मुंबईतील दुसऱ्या कसोटी सामन्याकडे आहे. या सामन्यात विराट कोहली कोणाची जागा घेणार हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. पहिल्या कसोटी सामन्याआधी के एल राहुलला दुखापत झाली होती. त्यामुळे तो सामना खेळू शकला नाही. 

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर 3 डिसेंबरपासून न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या कसोटी सामन्याआधी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे. के एल राहुल हळूहळू रिकव्हर होत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात के एल राहुल मैदानात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. 

के एल राहुल न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात खेळणार होता. मात्र, कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी मांडीच्या स्नायूंना दुखापत झाल्यामुळे त्याला आराम देण्यात आला. राहुल कानपूर कसोटीतून बाहेर पडल्यानंतर सूर्यकुमार यादवला संघात संधी मिळाली. 

सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यात एवढी चांगली कामगिरी करू शकला नाही. के एल राहुल आता व्यायाम करताना दिसत आहे. या व्यायामादरम्यानचा एक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

दुसऱ्या कसोटी सामन्यात के एल राहुल खेळताना दिसणार का? की त्याला आराम देण्यात येणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. शिवाय अय्यर आणि राहाणे पैकी कोणाला दुसऱ्या कसोटीमध्ये संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.