ना पराभवाने हरला, ना दुखापतीने खचला... स्वप्नपूर्तीसाठी 'तो' म्होरक्या म्हणून आलाय!

Kane Williamson Special Story :  सामना हातातून गेला असं समजलं अन् शांतपणे टोपी खाली घेतली. चेहऱ्यावर कडक स्माईल देणाऱ्या केनने लाखो क्रिडाप्रेमींचं मन जिंकलं. वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगलं अन् केन मागे वळून पाहिलंच नाही.

सौरभ तळेकर | Updated: Sep 12, 2023, 09:13 AM IST
ना पराभवाने हरला, ना दुखापतीने खचला... स्वप्नपूर्तीसाठी 'तो' म्होरक्या म्हणून आलाय! title=
Kane Williamson World Cup Special Story

ICC ODI World Cup 2023, Kane Williamson:  मैदानात ना कोणता चिडचिड, ना थयथयाट... सामन्यात तो इतका शांत की जणू काही बुद्धाची स्मृत मुर्ती. ऋषीमुनींसारख्या वाढवलेल्या दाढीवर चेहऱ्यावरची निरागस शांतता पाहून अख्तरसारखा खवटा देखील शांत झाला. कल्लोषाच्या वादळात तो आला अन् संघाला आसमंताच्या पल्याड घेऊन गेला. रस्ता तर खुप खडतर.. मात्र, त्याने हार मानली नाही, दुखापतीने खचला नाही.. अशातच हिंदोळ्यातून तो पुन्हा उमजलाय. त्याचं नाव केन विल्यमसन.

2019 चा वर्ल्ड कप गमावूनही जग जिंकणारा न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून केन विल्यमसनची ओळख निर्माण झाली. सर्वांना 2019 चा वर्ल्ड कप सामना आठवतच असेल. सामना हातातून गेला असं समजलं अन् शांतपणे टोपी खाली घेतली. चेहऱ्यावर कडक स्माईल देणाऱ्या केनने लाखो क्रिडाप्रेमींचं मन जिंकलं. वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगलं अन् केन मागे वळून पाहिलंच नाही. संघाच्या उणिवा दूर केल्या अन् आता तो पुन्हा दुधारी तलवारी घेऊन तयार झालाय. एकतर 4 वर्षानंतर संधी मिळते, हातावर हात ठेऊन शांत बसायचं तरी कसं? जखम दुखतीये, वेदना होतायेत, पण थांबायचं नाय... तो पुन्हा तयार झाला अन् आता वर्ल्ड कपमध्ये कमबॅक केलंय.

आगामी वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड संघाची टीम जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये देखील केन विलयमसनच्या खांद्यावर संघाची जबाबदारी देण्यात आलीये. आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीनंतर केन वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने केन विल्यमसनला दोन आठवड्याची मुदत देखील दिली होती. संघ जाहीर होईपर्यंत केन फीट असेल तर त्याला वर्ल्ड कपमध्ये घ्यावं, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, केनने गेल्या 10 दिवसात त्याच्या फिटनेसवर काम केलं अन् आता तो पुन्हा वर्ल्ड कप संघाचा भाग झालाय... नव्हे नव्हे तर तो कॅप्टन्सी देखील करणार आहे.

आणखी वाचा - World Cup साठी केन विलियम्सनची लागणार 'कसोटी', मॅनेजमेंटने दिला अल्टीमेटम!

ब्रेंडन मॅक्क्युलमकडून केनच्या हाती न्यूझीलंडच्या नेतृत्वाची धुरा अगदी सहजतेने आली. मॅक्क्युलम म्हणजे निव्वळ उडंगा प्लेयर... बॉल आता की ठोकायचा एवढंच त्याला माहिती. मात्र, केनने संघाला नवी दिशा दिली. 2011मध्ये वर्ल्ड कप सेमी फायनल, 2015 मध्ये उपविजेते, 2019 मध्ये उपविजेते असा टप्पा केनने गाठलाय. आता केन विल्यमसनसाठीचा हा चौथा वर्ल्ड कप असणार आहे. खेळामागचा विचार जगणारा केन आता नव्या उंचीवर पोहोचवलाय. तो लढला, झग़डला अन् जिंकला देखील. अनेक सामन्यात त्याने एकहाती गदा उचलली मात्र, आता सगळंच अवघड असणार आहे. केन पुन्हा मैदानात येईल अन् त्याच लयीत खेळेल सुद्धा.. पण नेहमी लक्षात राहिल ती त्याच्या चेहऱ्यावरची निरागस शांतता...