दोन तासांहून कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा विक्रम

मात्र विक्रमाची अधिकृत नोंद नाही...

Updated: Oct 13, 2019, 03:49 PM IST
दोन तासांहून कमी वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा विक्रम
फोटो सौजन्य : ट्विटर

नवी दिल्ली : केनियाचा प्रसिद्ध धावपटू एलियुड किपचोगे याने दोन तासांहून कमी वेळात मॅरेथॉन पूर्ण करणारा धावपटू ठरला आहे. बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ३४ वर्षीय किपचोगेने ही मॅरेथॉन एक तास ५९ मिनिटं आणि ४० सेकंदात पूर्ण केली आहे. मात्र ही खुली स्पर्धा नव्हती आणि शर्यतीत पेसमेकर्सचा उपयोग केल्याने या मॅरेथॉनबाबत कोणताही अधिकृत विक्रम नोंदवण्यात आला नाही. 

धावपटूच्या मदतीसाठी ४२ पेसमेकर्स होते. या संपूर्ण शर्यतीवेळी एलियुड किपचोगेच्या प्रशिक्षकांनी बाईकच्या मदतीने त्याला एनर्जी ड्रिंक आणि पाणी दिले. अनेकदा, मॅरेथॉन स्पर्धेवेळी धावपटूला स्वत:लाच टेबलवरील रिफ्रेशमेन्ट घ्यावं लागतं.

स्पर्धेवेळी एक वेळ अशी आली की, किपचोगे विक्रम करणार असं वाटू लागलं आणि पेसमेकर्सनी त्याला एकट्यालाच पुढे जाऊ दिलं. त्यानंतर किपचोगेने एकट्यानेच स्पर्धा पूर्ण केली. 

२०१८ मध्ये किपचोगेने बर्लिन येथे झालेल्या मॅरेथॉन दरम्यान शर्यत २ तास १ मिनिट आणि ३९ सेकंदात पूर्ण केली होती. किपचोगेच्या नावे या विक्रमाची अधिकृत नोंद आहे.