...तर विराट कोहलीचं निलंबन होणार

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर निलंबनाची टांगती तलवार आहे. 

Updated: Sep 25, 2019, 12:53 PM IST
...तर विराट कोहलीचं निलंबन होणार title=

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीवर निलंबनाची टांगती तलवार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचवेळी विराटला एक डिमेरिट पॉईंट आणि ताकीद देण्यात आली. यानंतर आता विराटला आणखी एक डिमेरिट पॉईंट मिळाला तर विराटचं निलंबन होईल. तिसऱ्या टी-२०वेळी ५व्या ओव्हरमध्ये विराटने रन काढत असताना ब्युरन हेन्ड्रिक्सच्या खांद्याला धक्का मारला.

विराटनं हा गुन्हा स्वीकारला आहे, त्यामुळे याची सुनावणी घ्यायची गरज नसल्याचं आयसीसीचे मॅच रेफ्री रिची रिचर्डसन म्हणाले. २ वर्षांमध्ये विराटचे ३ डिमेरिट पॉईंट झाले आहेत. 

विराट कोहलीला १५ जानेवारी २०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सेन्च्युरियन टेस्टवेळी पहिला डिमेरिट पॉईंट मिळाला. मैदानात अंपायरची गैरवर्तणूक केल्यामुळे विराटवर ही कारवाई झाली होती. यानंतर वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये प्रमाणापेक्षा जास्त अपील केल्यामुळे विराटला दुसरा डिमेरिट पॉईंट मिळाला. खेळाडूला २ वर्षात ४ डिमेरिट पॉईंट मिळाले, तर त्याचं निलंबन करण्यात येतं. त्यामुळे विराटला १६ जानेवारी २०२० पर्यंत आणखी एक डिमेरिट पॉईंट मिळाला, तर त्याला मैदानाबाहेर राहवं लागेल. 

४ डिमेरिट पॉईंट झाल्यानंतर खेळाडूला एक टेस्ट किंवा २ वनडे आणि २ टी-२० मॅच, यापैकी जे पहिले असेल त्याला मुकावं लागतं. या वर्षामध्ये भारत मोठा कालावधी क्रिकेट खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज, यानंतर नोव्हेंबरमध्ये बांगलादेश भारत दौऱ्यावर ३ टी-२० आणि २ टेस्ट मॅच खेळेल. यानंतर वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्धही भारत सीरिज खेळणार आहे.