'प्रो कबड्डी'नंतर आता महामुंबई कबड्डी लीगचा धमाका!

प्रो कबड्डी लीगमुळेच गल्लीबोळातली अस्सल मराठी कबड्डी लोकप्रियच नव्हे तर ग्लॅमरस झाली.

Updated: Jan 4, 2018, 08:10 PM IST
'प्रो कबड्डी'नंतर आता महामुंबई कबड्डी लीगचा धमाका! title=

मुंबई : प्रो कबड्डी लीगमुळेच गल्लीबोळातली अस्सल मराठी कबड्डी लोकप्रियच नव्हे तर ग्लॅमरस झाली. त्याच प्रो कबड्डीत महाराष्ट्राच्या खेळाडूंचे नाव अभिमानाने घेतले जावे, प्रो कबड्डीला राज्यातून दमदार-जोरदार खेळाडू मिळावेत, यासाठी मुंबईत महामुंबई कबड्डी लीगचं आयोजन करण्यात आलंय.  

१५ ते २१ जानेवारीदरम्यान कांदिवलीच्या चारकोप येथील विशाल सह्याद्री क्रीडानगरीत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या दिमाखदार कबड्डीचा आवाज महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या साहाय्याने घुमणार आहे.

आमच्या खेळाडूंना मॅटवरील तंत्र समजून घेऊन ते विकसित करणे या स्पर्धेचा आणखीन एक महत्त्वपूर्ण उद्देश आहे. महाराष्ट्रातील कबड्डीचा तांत्रिक पाया पक्का व्हावा यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत, अशी भूमिका अभिनव कला क्रीडा अकादमीचे सर्वेसर्वा अंकुश मोरे यांनी मांडली.

१२०० खेळाडूंमधून संघांची निवड

प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर खेळवल्या जाणाऱ्या महामुंबई कबड्डीच्या सहा संघांची निवडही १२०० खेळाडूंच्या चाचणी स्पर्धेतून केली गेली. या चाचणीसाठी मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईतून खेळाडू आले होते. त्यातून १०० खेळाडूंची निवड करण्यात आली असून आता त्यातूनच १२ खेळाडूंचे सहा संघ तयार केले जातील आणि उर्वरित खेळाडूंना राखीव ठेवले जाईल.

प्रत्येक संघाला ९ स्थानिक आणि ३ अन्य जिल्हयातील खेळाडूंची निवड करता येईल. प्रो कबड्डीप्रमाणे महामुंबई कबड्डीतही संघाचे मालक असतील. तेच खेळाडूंचा सर्व खर्च उचलतील. या स्पर्धेच्या तयारीसाठी ७ दिवसांचे सराव शिबीरही आयोजित केले जाणार आहे.

ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरीत खेळली जाणार असून एकूण १७ सामने खेळले जातील. गटात अव्वल राहणाऱ्या पहिल्या दोन संघांमध्ये महामुंबई कबड्डी लीगचा अंतिम सामना खेळला जाईल तर तिसऱ्या क्रमांकासाठी गटातील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघामध्ये झुंज रंगेल.

लाखोंची बक्षीसे, सर्वोत्तम खेळाडूंना दुचाकी

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या कबड्डीच्या धमाक्यात खेळाडूंना त्यांच्या पात्रतेनूसार मानधन दिले जाणार आहे. तसेच विजेत्याला एक लाखांच्या रोख पुरस्काराने गौरवले जाईल. उपविजेता संघ ७५ हजार रूपयांचे इनाम मिळवेल. त्याचप्रमाणे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंना दुचाकीने सन्मानित केले जाणार आहे.