टेनिस स्टार मारिया शारापोव्हाची निवृत्तीची घोषणा

टेनिस स्टार आणि पाच वेळा ग्रॅण्ड स्लॅम जिंकणाऱ्या रशियाच्या मारिया शारापोव्हाने निवृत्तीची घोषणा केली आहे.

Updated: Feb 26, 2020, 09:50 PM IST
टेनिस स्टार मारिया शारापोव्हाची निवृत्तीची घोषणा title=

लंडन : टेनिस स्टार आणि पाच वेळा ग्रॅण्ड स्लॅम जिंकणाऱ्या रशियाच्या मारिया शारापोव्हाने निवृत्तीची घोषणा केली आहे. शरीर साथ देत नसल्यामुळे आपण निवृत्तीचा निर्णय घेत असल्याचं मारिया शारापोव्हाने सांगितलं आहे. मारिया शारापोव्हाने २००४ साली वयाच्या १७व्या वर्षी विंबलडन स्पर्धा जिंकली. २०१२ साली फ्रेंच ओपन जिंकून शारापोव्हाने करियर स्लॅमही पूर्ण केलं.

२००४ साली शारापोव्हाने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या सेरेना विलियम्सला हरवून विंबलडन स्पर्धा जिंकली होती. २०१२ नंतर शारापोव्हाने २०१४ सालीही फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली. २००६ साली अमेरिकन ओपन आणि २००८ साली तिने ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियनशीप पटकावली.

२०१६ साली शारापोव्हाचं डोपिंगमुळे १५ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं. एप्रिल २०१७ साली शारापोव्हाने टेनिसमध्ये पुनरागमन केलं. पुनरागमनानंतर शारापोव्हाची कामगिरी खास राहिली नाही. खांद्याच्या दुखापतीने शारापोव्हाला ग्रासलं होतं.

जगातला सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरबद्दल माहिती नसल्यामुळे शारापोव्हाला मोठ्याप्रमाणावर ट्रोलही करण्यात आलं होतं.