क्रिकेटच्या नव्या नियमामुळे धोनी, गेल आणि वॉर्नरला बसणार असा फटका

क्रिकेटच्या नव्या नियमांचा फटका टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बसणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 19, 2017, 10:21 PM IST
क्रिकेटच्या नव्या नियमामुळे धोनी, गेल आणि वॉर्नरला बसणार असा फटका title=

मुंबई : क्रिकेटच्या नव्या नियमांचा फटका टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बसणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नर, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड यांनीही बसणार आहे. या फलंदाजांना आपली बॅट बदलावी लागणार आहे.

महेंद्रसिंग धोनी तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखला जातो. आपल्या आक्रमक फटकेबाजीने तो गोलंदाजांवर तुटून पडतो. धोनी, वॉर्नर,  ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड हे सर्व फलंदाज आतापर्यंत ज्या बॅटने उत्तुंग फटकेबाजी करायचे ती बॅट त्यांना लवकरच बदलावी लागणार आहे. 
 
या फलंदाजांच्या बॅटच्या कडा जाडजूड आहेत. मेरिलबोर्न क्रिकेट क्लब म्हणजे एमसीसीच्या नव्या  मार्गदर्शकतत्वांनुसार बॅटची कडा ही ४० मिलीमीटरपेक्षा कमी असली पाहिजे. या सर्व फलंदाजांच्या बॅटच्या कडेची जाडी जास्त असल्याने त्यांना बॅट बदलावी लागणार आहे. यावर्षी मार्च महिन्यात एमसीसीने नवी मार्गदर्शक तत्वे जारी केलीत.  

कर्णधार विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा एबी डिविलियर्स, ऑस्ट्रेलियाच स्टिव्ह स्मिथ, इंग्लंडचा ज्यो रुट यांच्या बॅटची कडा ४० मिलीमीटरपेक्षा कमी असल्याने त्यांना बॅट बदलण्याची आवश्यकता नाही. 

मात्र, ऑस्ट्रेलिया वॉर्नर, वेस्ट इंडिजचा गेल, पोलार्ड यांच्या बॅटची कडा ५० मिलीमीटर आहे त्यामुळे त्यांना सहज चौफेर फटकेबाजी करणे शक्य होते. भारताच्या विद्यमान संघात फक्त धोनीच्या बॅटची कडा ४५ मिलीमीटर आहे. भारतीय संघात फक्त धोनीच सर्वात वजनदार बॅट वापरतो. १२५०  ग्रॅम ते १३०० ग्रॅम त्याच्या बॅटचे वजन आहे. 

येत्या १ ऑक्टोंबर २०१७ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवे नियम लागू होणार आहेत.  मेरिलबोर्न क्रिकेट क्लब म्हणजे एमसीसीने हे नवीन नियम बनवले आहेत.