त्या चुकीसाठी मी आणि माझे बाबा जबाबदार, 'या' भारतीय क्रिकेटरचा खुलासा

या फलंदाजाने आयपीएलच्या 14 व्या मोसमात झंझावाती खेळी केली होती.

Updated: May 23, 2021, 07:19 PM IST
त्या चुकीसाठी मी आणि माझे बाबा जबाबदार, 'या' भारतीय क्रिकेटरचा खुलासा title=

मुंबई : पृथ्वी शॉ, टीम इंडियाचा युवा आणि आक्रमक सलामीवीर. पृथ्वीने (Prithvi Shaw) टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्याने नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या 14 व्या मोसमात दिल्ली कॅपिट्ल्सकडून धमाकेदार बॅटिंग केली. तर स्वत:च्या नेतृत्वात मुंबईला विजय हजारे करंडकाचं विजेतेपद मिळवून दिलं. मात्र, काही वर्षांपूर्वी पृथ्वीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. पृथ्वीने एका स्पर्धेदरम्यान जून 2019 मध्ये कफ सिरपचं सेवन केलं होतं. त्यामुळे त्याची डोपिंग टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. यामुळे बीसीसीआयने पृथ्वीवर 8 महिन्यांची निलंबनात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान, पृथ्वीने आता 2 वर्षानंतर या प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे. (me and my father is responsible to doping test says prithvi shaw)

पृथ्वी काय म्हणाला?
 
"या सर्व प्रकरणासाठी मी आणि माझे वडील जबाबदार होते. तेव्हा मी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी इंदूरमध्ये होतो. त्यावेळेस माझी प्रकृती बिघडली. मला खोकला आणि सर्दी होती. याबाबत मी वडिलांसोबत मोबाईलद्वारे संवाद साधला. तेव्हा वडिलांनी कफ सिरप घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, मी संघातील वैद्यकीय पथकाला माहिती न देता परस्पर कफ सिरपचं सेवन केलं", असं पृथ्वीने स्प्षट केलं. तो क्रिकबझसोबत बोलत होता. यावेळेस पृथ्वीने हा खुलासा केला. 

"तो काळ माझ्यासाठी फार वाईट होता. मी त्याबाबत माझ्या भावना शब्दांद्वारे व्यक्त करु शकत नाही. तेव्हा माध्यांमध्ये माझ्याबद्दल चर्चा सुरु होती. हे मी सहन करु शकलो नाही. त्यामुळे मी लंडनला निघून गेलो. स्वत:ला एका बंद खोलीत कोंडून घेतलं", असंही पृथ्वीने स्पष्ट केलं. 

डोपिंग टेस्टबाबत थोडक्यात

नियमांनुसार, कोणत्याही खेळाडूला स्पर्धेदरम्यान किंवा इतर वेळेस उत्तेजक पदार्थांचे सेवन करता येत नाही. खेळाडू ताकद वाढवण्यासाठी किंवा दमदार कामगिरी करण्यासाठी उत्तेजक पदार्थांचे सेवन करतात. खेळाडूने उत्तेजक पदार्थ घेतलेत का, हे जाणून घेण्यासाठी स्पर्धेदरम्यान डोपिंग चाचणी केली जाते. ही डोपिंग टेस्ट कधीही केली जाते. या टेस्टसाठी यूरिन सॅम्पल घेतले जाते. ही टेस्ट नाडा (National Anti-Doping Agency) किंवा (World Anti-Doping Agency) द्वारे केली जाते.

अशाच प्रकारे पृथ्वीची डोपिंग टेस्ट करण्यात आली. मात्र पृथ्वीने सर्दी खोकला असल्याने फिजीओंच्या सल्ल्याशिवाय कफ सिरफचं सेवन केलं होतं. या कफ सिरपमध्ये टर्ब्यूटालाईन हा घटक सापडला. टर्ब्यूटालाईन हा औषधाचा घटक प्रतिबंधित आहे.

त्यामुळे पृथ्वी डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह सापडला. मात्र, कफ सिरप दमदार कामगिरीसाठी घेतलं नसल्याचं पृथ्वीने स्पष्ट केलं होतं. त्यावेळेस पृथ्वी अवघ्या 19 वर्षांचा होता. पृथ्वीकडून हा सर्व प्रकार अनावधनाने झाला होता. तसेच तेव्हा पृथ्वी क्रिकेटमध्ये नवखा होता. त्यामुळे बीसीसीआयने पृथ्वीवर केवळ 8 महिन्यांची बंदी घातली. नियमांनुसार, टर्ब्यूटालाईनच्या सेवनासाठी संबंधित खेळाडूवर 2 वर्षांची बंदी घालण्यात येते.