मुंबई : भारतीय क्रिकेट संघाची गेल्या काही वर्षांमध्ये झालेली प्रगती पाहता याचं श्रेय प्रत्येक खेळाडूला दिलं गेलं. संघाला अतिशय भक्तम अशा स्थानी आणणाऱ्या संघ कर्धारांचंही कौतुक झालं. धोनी आणि सध्या कर्णधारपद भुषवणारा विराट कोहली ही त्याचीच उदाहरणं. एकिकडे हा कोहली क्रिकेटचं मैदान गाजवत असतानाच दुसरीकडे दुसरा कोहली मात्र कधी प्रसिद्धीझोतात आलाच नाही.
कोहली या आडनावात साधर्म्य असणारा यहा खेळाडू म्हणजे तरुवर कोहली. अंडर १९ विश्वचषकामध्ये जवळपास दहा, बारा वर्षांपूर्वी त्यानेही दमदार खेळाचं प्रदर्शन केल्याचं म्हटलं जातं. पण, जिथे विराटला पुढे जाण्यास वाव मिळाला तिथेच तरुवर मात्र काहीसा मागे पडला.
कोण आहे तरुवर कोहली?
मुळचा पंजाबचा असणारा तरुवर हा एक फलंदाज आहे. फक्त फलंदाजीच नव्हे, तर गोलंदाजीतही तो तरबेज आहे. त्याच्या कुटुंबातही खेळासाठीचं पूरक वातावरण असल्याचं म्हटलं जातं. तरुवरचे वडील हे एक तलतरणपटू असून, तो पोलोही खेळत असत.
तरुवरलाही त्याच्या खेळामुळे एकेकाळी चर्चांच्या वर्तुळात येण्याची संधी मिळाली. पण, त्याला वरिष्ठ खेळाडूंच्या क्रिकेट संघात मात्र स्थान मिळवता आलं नाही. जवळपास १२ वर्षांपूर्वी अंडर १९ क्रिकेट संघ विश्वचषक खेळण्यासाठी मलेशिया येथे गेला होता. त्यावेळी संघाचं कर्णधारपद विराट कोहलीच्या हाती होतं. संघाने या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. २००८ या वर्षात खेळल्या गेलेल्या अंडर १९ क्रिकेट विश्वचषकात तरुवर कोहली हे नाव चर्चेत होतं.
सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये त्याचं नाव तिसऱ्या स्थानावर होतं. मुख्य म्हणजे संघाच्या यशात तरुवचाही मोलाचा वाटा होता. याच बळावर त्याला आयपीएलमध्ये राजस्थानच्या संघात स्थान मिळालं. पण, तिथे मात्र त्याला उल्लेखनीय कामगिरी बजावता आली नाही. पुढील वर्षी त्याला पंजाबच्या संघातही स्थान देण्यात आलं. पण, तिथेही तरुवर अपयशी ठरला. त्यानंतर मात्र काही वर्षे तो प्रसिद्धीपासून दूर होता.
२०१३ या वर्षी त्याने पुन्हा एकदा रणजी स्पर्धेत त्रिशतकी खेळी करत क्रीडारसिकांचं लक्ष वेधलं होतं. पण, भारतीय संघात तो पुढे मात्र येऊ शकला नाही. गेल्या काही काळापासून तरुवरला पंजाबच्या संघातही स्थान मिळवण्यात काही अडचणींचा सामाना करावा लागला होता. ज्यानंतर त्याने २०१८- २०१९ मध्ये मिझोरमच्या संघातून खेळण्याचा निर्णय घेतला. सध्या त्याच संघातून खेळणाऱ्या तरुवर कोहली याच्या मनात आजही क्रिकेट जगतात नावलौकिक मिळवण्याची आस कायम आहे. त्यामुळे आता हा प्रसिद्धीझोतापासून दूर असणारा कोहली यशस्वी ठरतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.