मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात अखेर महेंद्रसिंह धोनीने (M S Dhoni) चौकार मारत चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) विजय मिळवून दिला आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. धोनी चेन्नईचा विजयाचा हिरो ठरला. (mi vs csk ipl 2022 m s dhoni hit four on last bowl and chennai win sensetional match by 3 wickets against mumbai indians)
चेन्नईला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज होती. धोनीने चौकार मारुन चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नईचा हा या मोसमातील दुसरा विजय ठरला. तर मुंबईचा हा सलग सातवा पराभव झाला. यासह मुंबईचं या मोसमातील आव्हान संपुष्टात आलं.
मुंबई इंडिन्सने चेन्नई सुपर किंग्सला 156 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईकडून अंबाती रायडुने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. तर रॉबिन उथप्पाने 30 धावांचं योगदान दिलं. तसेच धोनीने निर्णायक क्षणी 28 धावांची नाबाद विजयी खेळी साकारली. तर प्रिटोरियसने नाबाद 22 धावा करत धोनीला चांगली साथ दिली.
मुंबईकडून डॅनियल सॅम्सने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जयदेव उनाडकटने 2 तर रायली मेरेडिथने 1 विकेट घेतली. तर जसप्रीत बुमराह विकेट्स घेण्यात अपयशी ठरला.
त्याआधी चेन्नईने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. तिलक वर्माच्या (Tilak Varma) झुंजार 51 धावांच्या जोरावर मुंबई इंडिन्सने चेन्नई सुपर किंग्सला 156 धावांचे आव्हान दिले. मुंबईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 155 धावापर्यंत मजल मारली. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या.
सूर्यकुमार यादवने 32 धावांची खेळी केली. युवा ऋतिक शौकीनने 25 धावांचं योगदान दिलं. तर रोहित शर्मा आणि इशान किशन या दोघांनी घोर निराशा केली. रोहित आणि इशान या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर डेवाल्ड ब्रेविसही 4 धावा करुन माघारी परतला.
चेन्नईकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. ड्वेन ब्राव्होने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मिचेल सॅंटनर आणि महेश तीक्ष्णा या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, रायली मेरेडिथ, ऋतिक शौकीन, डेनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह आणि जयदेव उनादकट.
सीएसकेचे अंतिम 11 शिलेदार : रवींद्र जडेजा (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, एमएस धोनी, ड्वेन ब्रावो, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, महीश तीक्षणा आणि मुकेश चौधरी.
தல Dhoni Day #IPL20222 #Dhoni pic.twitter.com/k0IcGgzO7I
— sundarsun (@sundhag) April 21, 2022