बारबाडोस : पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद इरफाननं टी-२० क्रिकेटमध्ये विश्वविक्रम रचला आहे. मोहम्मद इरफाननं ४ ओव्हरमध्ये ३ मेडन आणि १ रन देऊन २ विकेट घेतल्या. इरफाननं त्याच्या ४ ओव्हरमधल्या शेवटच्या बॉलवर १ रन दिली. कॅरेबियन सुपर लीग(सीपीएल)मध्ये बारबाडोस ट्रायडन्ट्सकडून खेळताना इरफाननं सेंट किट्स अॅण्ड नेव्हीस पॅट्रियट्सविरुद्ध खेळताना मोहम्मद इरफाननं ही कामगिरी केली. या मॅचमध्ये इरफाननं क्रिस गेल आणि एव्हिन लुईसची विकेट घेतली.
मोहम्मद इरफानच्या या कामगिरीनंतरही या मॅचमध्ये बारबाडोस ट्रायडन्ट्सचा पराभव झाला. या विक्रमानंतर मी आनंदी आहे, पण टीमचा विजय झाला असता तर मी आणखी आनंदी झालो असतो, अशी प्रतिक्रिया मोहम्मद इरफाननं आयसीसीला दिली आहे.
आत्तापर्यंत खेळवण्यात आलेल्या टी-२० क्रिकेटमध्ये ४ ओव्हर टाकल्यानंतर एवढ्या कमी रन द्यायची ही पहिलीच वेळ आहे. मोहम्मद इरफाननं ०.२५ च्या इकोनॉमी रेटनं बॉलिंग टाकली. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिस मॉरीसच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. २०१४ साली रॅमस्लॅम लीगमध्ये केप कोब्रासकडून खेळताना क्रिस मॉरीसनं ०.५ च्या इकोनॉमी रेटनं बॉलिंग केली होती. तर २०१५ साली श्रीलंकेच्या चनाका वेलेगदेरानं तामिळ यूनियनकडून खेळतानाही ०.५ च्या इकोनॉमी रेटनं बॉलिंग केली होती.
या मॅचमध्ये बारबाडोस ट्रायडन्ट्सनं २० ओव्हरमध्ये १४७/६ एवढा स्कोअर केला होता. सेंट किट्स अॅण्ड नेव्हीस पॅट्रियट्सनं १८.५ ओव्हरमध्ये हे लक्ष्य पूर्ण केलं.
What a performance from Mohammad Irfan to take the #Playoftheday crown at match 16 of #CPL18 #Cricketplayedlouder pic.twitter.com/U9ZGC8J5v2
— CPL T20 (@CPL) August 26, 2018