कोलकाता : बीसीसीआयनं दिलेले आदेश मोहम्मद शमीनं धुडकावून लावले आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये शमीनं १५ ते १७ ओव्हर बॉलिंग करावी, असे आदेश बीसीसीआयनं दिले होते. पण पश्चिम बंगालकडून खेळताना केरळविरुद्धच्या मॅचमध्ये शमीनं २६ ओव्हर बॉलिंग केली आणि ३ विकेट घेतल्या. शमीच्या बॉलिंगमुळे केरळची टीम ३०० पेक्षा कमी रनवर आऊट झाली. तरी केरळच्या टीमला पहिल्या इनिंगची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी शमीची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. या सीरिजमध्ये पूर्ण फिट राहण्यासाठी बीसीसीआयनं शमीला रणजी ट्रॉफीमध्ये १५-१७ ओव्हर टाकायलाच सांगितल्या होत्या. शमीनं मात्र यापेक्षा जास्त बॉलिंग केली.
केरळविरुद्धच्या मॅचमध्ये बंगालची टीम १४७ रनवर ऑल आऊट झाली. यानंतर केरळच्या टीमनं २९१ रन केले. त्यामुळे त्यांना १४४ रनची आघाडी मिळाली. मोहम्मद शमीनं केरळला मोठी आघाडी घेण्यापासून रोखलं. जेव्हा तुम्ही स्वत:च्या राज्यासाठी खेळता तेव्हा तुमच्याकडे जास्त जबाबदारी असते. मला कोणतीही अडचण येत नसल्यामुळे मी जास्त बॉलिंग केल्याचं शमी म्हणाला. हा माझा वैयक्तिक निर्णय असल्याचंही शमीनं स्पष्ट केलं. मी चांगली तयारी केली आहे. ऑस्ट्रेलियात जाऊन मला अभ्यास मॅचही खेळायची आहे. मी टेस्ट सीरिजसाठी तयार असल्याचं वक्तव्य मोहम्मद शमीनं केलं आहे.
बंगालकडून खेळताना शमीनं सर्वाधिक बॉलिंग केली. शमीनं इनिंगमध्ये २६ ओव्हर टाकल्या. तर अशोक डिंडानं १९ इशान पोरेलनं १८ आणि मुकेश कुमारनं १४ ओव्हर टाकल्या.
मोहम्मद शमीनं यावर्षी भारताकडून खेळलेल्या ९ टेस्ट मॅचमध्ये ३३ विकेट घेतल्या आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इनिंगमध्ये घेतलेल्या ५ विकेटचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजची पहिली टेस्ट ६ डिसेंबरपासून ऍडलेडमध्ये खेळवण्यात येणार आहे. या टेस्ट मॅचआधी शमीवर जास्त ताण येऊ नये म्हणून रणजीमध्ये १५-१७ ओव्हर टाकायलाच बीसीसीआयनं सांगितलं होतं.
मोहम्मद शमीवर जास्त बॉलिंग टाकण्यासाठी कोणताही दबाव नव्हता. त्यानं स्वत:हूनच एवढ्या ओव्हर टाकल्या, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालचे प्रशिक्षक साईराज बहुतुलेनं दिली.