२०१८ मध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज

भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीदेखील पहिल्या ५ गोलंदाजांच्या यादीत आहेत.

Updated: Jan 3, 2019, 03:01 PM IST
२०१८ मध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज title=

मुंबई: २०१८ मधील सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाजाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात सर्व संघातील गोलंदाजाचा समावेश आहे. पहिल्या क्रमंकावर दक्षिण अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आहे. तसेच भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीदेखील पहिल्या ५ गोलंदाजांच्या यादीत आहेत. विशेष म्हणजे यादीत ४ वेगवान गोलंदाज आहेत, तर १ फिरकी गोलंदाज आहे.   

२०१८ मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज खालीलप्रमाणे 

 

१) कागिसो रबाडा:

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने २०१८ मध्ये कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी पटकावण्याचा मान मिळवला आहे. २०१८ मध्ये रबाडा याने उत्तम गोलंदाजीच्या जोरावर केवळ १० सामन्यांत ५२ बळी घेतले आहेत. यामध्ये त्याने एका सामन्यात १० बळी घेतले आहेत, तसेच दोन वेळा ५ बळी घेण्याची चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. रबाडा याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ६ अशा ११ बळी घेत २०१८ मध्ये सर्वोत्तम कामगिरी केली.

 

२) दिलरुवान परेरा:

श्रीलंकेसाठी जरी हे वर्ष खास ठरले नसले तरी दिलरुवान परेरासाठी हे वर्ष खास ठरले आहे. त्याने २०१८ मध्ये कसोटीत ११ सामन्यांत २९.३२ च्या सरासरीने ५० बळी घेतले. त्यामुळे परेरा २०१८ मध्ये ५० बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. गेल्या जुलै महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गाले येथे झालेला कसोटी सामन्यात त्याने विशेष कामगिरी केली होती. त्या सामन्यात परेरा याने १० बळी घेत २०१८ मध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने २०१८ मध्ये ३ वेळा एका डावात ५ बळी घेतले आहे.

 

3) नॅथन लायन:

ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने या यादीत तिसरा क्रमांक मिळवला. तो २०१८ मध्ये पहिल्या ५ गोलंदाजांमध्ये एकमेव फिरकी गोलंदाज आहे.
त्याने २०१८ मध्ये उत्तम कामगिरी करताना १० कसोटी सामन्यांत ३४.०२ च्या सरासरीने ४९ बळी घेतले. यात त्याने २ वेळा एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केली.  त्याने पर्थ कसोटीत भारताविरुद्ध केवळ १०६ धावा देऊन ८ बळी घेऊन गेल्या वर्षातील सर्वोत्तम कामगिरी बजावली आहे.

 

४) जसप्रीत बुमराह:

भारताचा गेल्या वर्षीचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गेल्या वर्षी कसोटीत पदार्पण केले. पदार्पणाच्या वर्षीच अशी उत्कृष्ट कामगिरी त्याने केली आहे. त्याने ९ सामन्यांत खेळताना २१.०२ च्या सरासरीने ४८ बळी घेतले आहेत .विशेष म्हणजे हे सर्व बळी त्याने परदेशी दौऱ्यातच घेतले आहेत. तसेच तो दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात एका डावात ५ बळी घेणारा आशियातील पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८६ धावा देऊन ९ बळी घेत त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली.

 

५) मोहम्मद शमी:

यावर्षी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही कसोटी सामन्यात उत्तम कामगिरी केली आहे. शामीने  २०१८ मध्ये १२ कसोटी सामन्यात २६.९७च्या सरासरीने ४७ बळी घेतल्या आहेत. तसेच त्याने २०१८ मध्ये पहिल्यांदाच एका वर्षात ४० बळी घेण्याचा टप्पा गाठला आहे. त्याने २०१८ मध्ये एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी २ वेळा केली आहे. जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७४ धावा देऊन ६ बळी घेण्याची २०१८ मध्ये सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.