धोनीची सुरुवात आणि शेवट...४ मॅच, २ योगायोग

टीम इंडियाच्या सगळ्यात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

Updated: Aug 15, 2020, 11:23 PM IST
धोनीची सुरुवात आणि शेवट...४ मॅच, २ योगायोग

मुंबई : टीम इंडियाच्या सगळ्यात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आज संध्याकाळी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करून ७ वाजून २९ मिनिटांपासून आपण निवृत्त झाल्याचं समजावं, असं धोनी या पोस्टमध्ये म्हणाला आहे. सोबतच धोनीने मे पल दो पल का शायर हूं हे गाणंही व्हिडिओसोबत जोडलं आहे. 

धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ सालचा टी-२० वर्ल्ड कप, २०११ सालचा ५० ओव्हरचा वर्ल्ड कप आणि २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. 

२००४ साली आपली पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारा धोनी २०१९ साली शेवटची मॅच खेळला. आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये धोनीच्या बाबतीत अजब योगायोगही पाहायला मिळाले. एमएस धोनी हा आपल्या पहिल्या आणि अखेरच्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये रन आऊट झाला. याचसोबत कर्णधार म्हणून धोनीची पहिली मॅच आणि अखेरची मॅचही टाय झाली. 

२३ डिसेंबर २००४ साली बांगलादेशविरुद्धच्या वनडेमधून धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या मॅचमध्ये पहिल्याच बॉलला धोनी रन आऊट झाला. तर ९ जुलै २०१९ साली न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कपची सेमी फायनल धोनीची अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच ठरली. या मॅचमध्येही धोनी रन आऊटच झाला. आपल्या अखेरच्या मॅचमध्ये धोनीला ७२ बॉलमध्ये ५० रन करता आले. 

२००७ सालच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये धोनीला पहिल्यांदा कर्णधारपद सोपवण्यात आलं. या स्पर्धेचा भारताचा पहिला सामना स्कॉटलंडविरुद्ध होता, पण पावसामुळे तो सामना होऊ शकला नाही. अखेर पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमधून धोनीने कर्णधार म्हणून पदार्पण केलं. भारत आणि पाकिस्तानमधली ही टी-२० मॅच टाय झाली, अखेर बॉल आऊटमध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं. 

२०१८ आशिया कपमधला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना धोनीचा कर्णधार म्हणून अखेरचा सामना ठरला. २०१८ सालच्या आशिया कपमध्ये विराट कोहलीला विश्रांती दिल्यामुळे रोहितच्या नेतृत्वात भारत खेळत होता. पण अफगाणिस्तानविरुद्धचा मॅचमध्ये रोहित आणि अन्य दिग्गज खेळाडूंनी विश्रांती घेतल्यामुळे धोनीला पुन्हा एकदा एका मॅचसाठी टीमचं नेतृत्व देण्यात आलं. भारत आणि अफगाणिस्तानविरुद्धची ही मॅचही टाय झाली.