मुंबई : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये निवड न झाल्यामुळे नाराज झालेल्या अंबाती रायुडूने निवड समितीवर निशाणा साधला होता. वर्ल्ड कप पाहण्यासाठी 3D चष्म्याची ऑर्डर दिली आहे, असं ट्विट रायुडूने केलं होतं. रायुडूच्या या ट्विटचा आनंद घेतल्याचं निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले आहेत. वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये अंबाती रायुडूऐवजी विजय शंकरला संधी देण्यात आली. विजय शंकर हा बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग करू शकतो. त्यामुळे विजय शंकर हा 3D खेळाडू आहे, असं निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी त्यावेळी सांगितलं होतं. यावरूनच रायुडूने 3D ट्विट केलं होतं.
'रायुडू टीममध्ये कुठे बसतो हे पाहण्यासाठी अनेक कार्यक्रम तयार करण्यात आले होते. निवड समिती कुठल्या एका खेळाडूच्या विरोधात नसते. टी-२० मधल्या कामगिरीमुळे रायुडूची वनडे टीममध्ये निवड झाली तेव्हा आमच्यावर टीका झाली. तरी आम्ही त्याच्याबद्दल विचार केला होता,' असं एमएसके प्रसाद म्हणाले.
'जेव्हा रायुडू फिटनेस टेस्टमध्ये फेल झाला तेव्हा आम्ही त्याचं समर्थन केलं. काही कॉम्बिनेशनमुळे त्याची निवड करण्यात आली नाही, याचा अर्थ निवड समिती त्याच्या विरोधात आहे, असं नाही,' अशी प्रतिक्रिया प्रसाद यांनी दिली.
अंबाती रायुडूला वर्ल्ड कपसाठीच्या १५ खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली नाही. राखीव खेळाडूंमध्ये असूनही शिखर धवन आणि विजय शंकरच्याऐवजी ऋषभ पंत आणि मयंक अग्रवालची निवड करण्यात आली. यानंतर अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
अंबाती रायुडूने ५५ वनडेमध्ये ४७.०५ च्या सरासरीने एकूण १,६९४ रन केल्या. यामध्ये ३ शतकं आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेमध्ये रायुडूचा सर्वाधिक स्कोअर १२४ रन आहे. ६ टी-२० मॅचमध्ये रायुडूने १०.५० च्या सरासरीने ४२ रन केले. ९७ प्रथम श्रेणी मॅचमध्ये रायुडूने ६,१५१ रन केले.