मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवहार ठप्प झाल्याचं चित्र होतं. क्रीडा जगतालाही याचा फटका बसला होता. अनेक स्पर्धा आणि क्रिकेटचे सामने कोरोनाच्या भीतीमुळं रद्द करण्यात आले होते. तर, काहींच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले होते. इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएललाही याचा फटका बसला होता. पण, अखेर यंदाच्या वर्षीच IPL 2020 चा संग्राम पार पडणार असून, याच्या अधिकृत सारखांचीही घोषणा करण्यात आली आहे.
IPL च्या अध्यक्षपदी असणाऱ्या ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. १९ सप्टेंबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत UAE येथे हे सामने पार पडणार आहेत.
पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात सामन्यांचं वेळापत्रक ठरवण्यासाठीची बैठक असणार आहे. त्याशिवाय सरकारच्या अधिकृत परवानगीचीही प्रतिक्षा असेलच. यंदाच्या वर्षीसुद्धा तब्बल ५१ दिवस क्रिकेटचा हा 'RUNसंग्राम' रंगणार असल्याची माहिती पटेल यांनी दिली.
Indian Premier League (IPL) 2020 to be played from 19th September to 8th November. It will be a full-fledged tournament: Brijesh Patel, IPL Chairman pic.twitter.com/QsULr9EqtZ
— ANI (@ANI) July 24, 2020
दरम्यान, आयपीएलचे सामने पार पडणार असले तरीही यंदाच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप मात्र पुढे ढकलण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने (आयसीसी) सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं टी-20 वर्ल्ड कपबद्दल चिंता व्यक्त केली होती. कोरोनाच्या या संकटकाळात सामन्यांच्या आयोजनास ते तयार नव्हते. त्यातही प्रेक्षकांची अनुपस्थिती नाकारता येणार नव्हती. परिणामी प्रेक्षकांशिवाय विश्वचषकासारख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात अर्थ नसल्यामुळं तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.