T-20 वर्ल्डकप लांबणीवर, आता आयपीएलकडे लक्ष

यंदा ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-२० वर्ल्डकप कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे.

Updated: Jul 20, 2020, 09:19 PM IST
T-20 वर्ल्डकप लांबणीवर, आता आयपीएलकडे लक्ष title=

दुबई : अखेर यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलला आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने (आयसीसी) सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आयोजनाचा मार्गही खुला झाला आहे.

कोरोना विषाणूमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या वर्ल्डकपवर टांगती तलवार होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही टी-20 वर्ल्ड कपबद्दल चिंता व्यक्त केली होती. कोरोनामुळे ते याचं आयोजन करण्यात तयार नव्हते.

कोरोनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे यावर्षी टी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये प्रेक्षकांसह आयोजित करणे कठीण होते आणि प्रेक्षकांशिवाय विश्वचषक सारख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून तो पुढे ढकलण्यात आला आहे. 

आयसीसी पुरूष टी -20 वर्ल्ड कप 2021 ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 रोजी आणि फायनल 14 नोव्हेंबर 2021 रोजी होईल.

आयसीसी पुरूष टी-20 वर्ल्ड कप 2022 ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 रोजी होईल आणि फायनल 13 नोव्हेंबर 2022 रोजी होईल.

आयसीसी पुरुष विश्वचषक 2023 ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2023 मध्ये भारतात आणि फायनल 26 नोव्हेंबर 2023 रोजी होईल.

आयपीएल कधी?

टी-20 वर्ल्ड कप 2020 पुढे ढकलल्यानंतर आता आयपीएलचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बीसीसीआय 26 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान आयपीएल सीझन 13 चं आयोजन करण्याचा विचार करीत आहे. बीसीसीआय युएईमध्ये आयपीएल सीझन 13 च्या आयोजनाचा विचार करत आहे.

श्रीलंका आणि युएईने यापूर्वीच बीसीसीआयसमोर आयपीएल सीझन 13 आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आतापर्यंत आयपीएल दोनदा भारताबाहेर आयोजित करण्यात आला होता.