Natasa Stankovic Video: भारतीय क्रिकेट संघाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या चर्चेत आहे. हार्दिक पांड्याने टी-20 वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली असल्याने त्याचं कौतुक होत असताना, त्याचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा प्रकाशझोतात आहे. याचं कारण नताशा स्टेनकोविक (Natasa Stankovic) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दोघांनी घटस्फोट घेतल्याची शंका व्यक्त होत असून, दोघे एकत्र दिसत नसल्याने या दाव्यांना बळ मिळत आहेत. यादरम्यान नताशाने शेअर केलेला एक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. तिने या व्हिडीओतून एकाप्रकारे घटस्फोट झाल्याचं मान्य केल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
नताशा आणि हार्दिक पांड्या दोघेही सोशल मीडियावर फार सक्रीय असतात. दोघे अनेक पोस्ट शेअर करत आहेत. मात्र एकाही फोटोत ते दोघे एकत्र दिसत नाही आहेत. इतकंच नाही तर भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर नताशाने हार्दिकसाठी पोस्टही शेअर केली नव्हती. यामुळे दोघांनी खरंच घटस्फोट घेतला असावा असे दावे छातीठोकपणे केले जात आहेत.
नताशाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती सांगत आहे की, "मी पुन्हा तुम्हा सर्वांना आठवण करुन देऊ इच्छिते की, देवाने तांबडा समुद्र पूर्णपणे हटवला नाही तर त्याचे दोन भाग केले. याचा अर्थ ते तुमच्या आयुष्यातील कोणतीही समस्या पूर्णपणे संपवणार नाहीत. ते तुम्हाला त्यातून मार्ग काढायला देतील".
नताशा सध्या आपला मुलगा अगस्त्यसह वेळ घालवत आहे. शनिवारी सकाळी तिने आपल्या इंस्टाग्रामला अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले. ही पोस्ट शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये 'Living in Gratitute' लिहिलं होतं, तसंच हार्ट इमोजीही वापरलं होतं.
नताशाने पहिला फोटो स्वत:चा शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पांढरा शर्ट घालून कारमध्ये बसलेली दिसत आहे, दुसऱ्या फोटोमध्ये सनस्क्रीन आणि तिसऱ्या फोटोमध्ये जिम मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. चौथा फोटो फूडचा आहे आणि पाचव्या फोटोत नताशा तिचा मुलगा अगस्त्यसोबत स्पेस सूटमध्ये दिसत आहे. यानंतर सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्रीने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, जी तिच्या मुलाने शूट केली आहे, ज्यामध्ये नताशा कॅमेरासाठी पोज देताना दिसत आहे.
हार्दिक आणि नताशाचं 2020 मध्ये लग्न झालं होतं. करोनादरम्यान त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं होतं. यानंतर 2023 त्यांनी पुन्हा एकदा लग्न केलं. यावेळी त्यांनी हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. नताशा आणि हार्दिकच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
नताशा आणि हार्दिक पांड्या यांच्या विभक्त होण्याच्या आणि घटस्फोटाच्या अफवा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. मात्र अद्यापपर्यंत नताशा किंवा हार्दिक यांनी यावर मौन बाळगलं आहे. दोघांनीही यावर अधिकृत भाष्य केलेलं नाही, पण कोणत्याही फोटो, व्हिडीओत ते एकत्र दिसत नसल्याने नेटकरी यावर शिक्कामोर्तब करत आहेत.