मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीतील मंडळी इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यादरम्यान ऐश्वर्याला चहाचा कप देत होते, या वादग्रस्त वक्यव्यावर आता माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या विराट कोहलीची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून इंजिनियर यांच्या या वक्तव्याला सडेतो़ड उत्तर दिलं, ज्यानंतर आता त्यांचं हे स्पष्टीकरण समोर येत आहे.
ते वक्तव्य आपण फक्त मस्करीच्या ओघात केल्याचं म्हणत त्या माध्यमातून अनुष्काला चुकीच्या अनुशंगाने काहीच म्हणण्याचा आपला हेतू नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 'मी ते फक्त मस्करीत म्हणालो आणि आता त्या राईचा पर्वत केला जात आहे. उगाचच अनुष्काला या वादात खेचलं जात आहे', असं म्हणत विराट कोहली, रवी शास्त्री यांची इंजिनियर यांनी प्रशंसा केली. या प्रकरणाला उगाचच हवा दिली जात आहे असं म्हणत भारताचं ब्लेझर घातलेला तो व्यक्ती निवड समितीतील असल्याचं वाटलं होतं, असं ते एका वाहिनीशी संवाद साधताना म्हणाले.
'वर्ल्ड कपदरम्यान मी एका निवड समिती सदस्याला ओळखूही शकलो नाही. भारतीय ब्लेझर घालणारा हा तरी कोण ? असं मी विचारलं तेव्हा हा निवड समिती सदस्य असल्याचं उत्तर मिळालं. हा व्यक्ती अनुष्का शर्माच्या बाजूला होता आणि तिला चहाचा कप देत होता,' असं फारुख इंजिनियर म्हणाले, त्यांच्या या वक्तव्यावरुनच अनुष्काचाही पारा चढला. ज्यानंतर तिने आपलं नाव चुकीच्या प्रकरणांमध्ये चुकीच्या पद्धतीने घेतलं जात असल्याचं पाहून फक्त इंजिनियर यांनाच नव्हे तर, असं करणाऱ्या सर्वांनाच धारेवर धरलं होतं.
निवड समितीच्या निर्णयांमध्ये आपला हस्तक्षेप असण्याच्या चर्चा, संघाकडून विशेष वागणूक मिळण्याच्या चर्चा आणि कहर म्हणजे आताचा चहा प्रकरण या साऱ्या आरोपांवर अनुष्काने उत्तर देत आपण एक स्वाभिमानी आणि स्वतंत्र महिला असल्याची बाब अधोरेखित करत अनेकांनाच सडेतोड उत्तर दिलं होतं.