तिरुअनंतपुरम : भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.
सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार सामना ८ षटकांचा खेळवण्यात येत आहे. दोन्ही संघातील प्रत्येकी चार गोलंदाजांना २-२ षटके टाकण्याची संधी मिळणार आहे. सामना ७ वाजता सुरु होणार होता. मात्र पावसाचा व्यत्यय कायम राहिल्याने सामना सुरु होण्यास उशिर झाला.
तीन सामन्यांच्या मालिकेत भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघानी प्रत्येकी एक सामना जिंकलाय. त्यामुळे मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ तितकेच प्रयत्नशील असतील.
पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली होती. दुसऱ्या सामन्यात पाहुण्या संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली.
तर या सामन्यात भारताच्या खेळाडूंनी निराशा केली. फलंदाजीत आजी-माजी कर्णधारांनी चांगला खेळ केला. मात्र इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय फलंदाजाची कामगिरी चांगली होणे महत्त्वाचे आहे.