लाहोर : हिंदू असल्यामुळे दानिश कनेरियावर अन्याय करण्यात आल्याचा गौप्यस्फोट पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने केला. पाकिस्तानी खेळाडू दानिश कनेरियासोबत जेवायलाही आक्षेप घ्यायचे, असं धक्कादायक वक्तव्य शोएबने केलं. खुद्द दानिश कनेरियानेही शोएब अख्तरच्या या वक्तव्याला दुजोरा दिला. आतापर्यंत याबाबत बोलण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं, पण आता त्या खेळाडूंची नावं मी सांगणार आहे. हिंदू असल्यामुळे अनेक खेळाडू माझ्याशी बोलायचे नाहीत, असं दानिश कनेरिया म्हणाला.
पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास बघितला तर त्यांच्या टीमकडून ६७ वर्षांमध्ये फक्त दोनच हिंदू क्रिकेटपटू खेळले आहेत. यातला एक दानिश कनेरिया आहे, तर दुसरे अनिल दलपत हे होते. अनिल दलपत हे दानिश कनेरियाचे मामा आहेत.
अनिल दलपत यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द फार काळ चालली नाही. अनिल दलपत यांनी ९ टेस्ट आणि १५ वनडे मॅच खेळल्या. दलपत यांच्या नावावर टेस्टमध्ये १६७ रन आणि वनडेमध्ये ८७ रन आहेत. १९८४ ते १९८६ या कालावधीमध्ये दलपत पाकिस्तानकडून खेळले. विकेट कीपर असलेल्या दलपत यांनी टेस्टमध्ये २५ आणि वनडेमध्ये १५ विकेट घेतल्या. पाकिस्तानचे माजी कर्णधार इमरान खान यांच्यामुळे आपली कारकिर्द खराब झाली असे आरोप दलपत यांनी २००२ साली केला होता.
दानिश कनेरियाच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये २६१ विकेट आणि वनडेमध्ये १५ विकेट आहेत. कनेरियाने त्याची शेवटची टेस्ट मॅच २०१० साली नॉटिंगहममध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली. भारताविरुद्ध ६ टेस्ट मॅचमध्ये कनेरियाने ३१ विकेट घेतल्या.
२००९ साली एसेक्सकडून खेळताना स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी दानिश कनेरिया दोषी आढळला. त्यामुळे कनेरियावर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ५ वर्षांची बंदी घातली. याविरोधात दानिशने अपील केलं होतं, पण हे दानिशचं हे अपील रद्द करण्यात आलं. अखेर २०१८ साली दानिशने स्पॉट फिक्सिंग केल्याचं कबूल केलं.