'मी अनेक संघांसह काम केलं, पण असला...', प्रशिक्षक गॅरी कर्स्टन पाकिस्तान संघावर संतापले, 'सुधारला नाहीत तर...'

पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांनी संघ टी-20 स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. आपल्या शांत स्वभावासाठी ओळखले जाणारे गॅरी कर्स्टन प्रचंड चिडले आहेत.     

शिवराज यादव | Updated: Jun 17, 2024, 08:38 PM IST
'मी अनेक संघांसह काम केलं, पण असला...', प्रशिक्षक गॅरी कर्स्टन पाकिस्तान संघावर संतापले, 'सुधारला नाहीत तर...' title=

टी-20 स्पर्धेत (T20 World Cup) सुपर-8 मध्येही दाखल न होऊ शकल्याने पाकिस्तान क्रिकेट संघावर (Pakistan Cricket Team) कडाडून टीका होत आहे. त्यातच मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) आणि पाकिस्तान संघात वाद असल्याच्या चर्चा समोर येत आहेत. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहिलेल्या गॅरी कर्स्टन यांनी आयर्लंडविरोधातील सामन्यानंतर झालेल्या बैठकीत प्रत्येक खेळाडूची खरडपट्टी काढली आहे. संघात अजिबात एकजूड नसल्याचं सांगत त्यांनी खेळाडूंना कडक शब्दांत सुनावलं आहे. 

पाकिस्तानमधील जिओ सुपर न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी खेळाडूंमध्ये एकजूट नसल्याचं पाहून गॅरी कर्स्टन नाराज झाले होते. एका प्रसिद्ध पाकिस्तानी क्रीडा पत्रकाराने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, गॅरी कर्स्टन संघाकडे आपली ही निराशा बोलून दाखवली आहे. 

"पाकिस्तान संघात अजिबात एकजूट नाही. तुम्ही याला संघ म्हणत असाल, पण हा संघ अजिबात नाही. तुम्ही एकमेकांना अजिबात पाठिंबा देत नाही. प्रत्येकजण डाव्या, उजव्या अशा वेगळ्या बाजूने आहे. मी अनेक संघांसह काम केलं आहे, पण अशी स्थिती पाहिली नाही," अशा शब्दांत गॅरी कर्स्टन यांनी संताप व्यक्त केला. 

गॅरी कर्स्टन यांच्या या टीकेमुळे पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील पत्रकारांनाही या टीकेमुळे आश्चर्य वाटत आहे. गॅरी कर्स्टन यांनी पत्रकार परिषद किंवा सार्वजनिकपणे अशी विधानं केलेली नाही. उलट ते दक्षिण आफ्रिकेला मायदेशी परतण्याच्या मार्गावर आहेत. कारण पाकिस्तानचे काही खेळाडू मियामीहून दुबईमार्गे पाकिस्तानला जाणार आहेत तर कर्णधार बाबर आझमसह सहा जण सुट्टीच्या दिवशी यूकेला जातील.

जिओ सुपरने केलेल्या दाव्यानुसार, पाकिस्तान क्रिकेटमध्ये ऐक्याचा अभाव हा एकमेव पैलू नव्हता. कर्स्टनने कौशल्य आणि तंदुरुस्तीच्या बाबतीत संघ आणि खेळाडू किती मागे आहेत याकडेही लक्ष वेधले. फलंदाजांच्या शॉट निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. कोणता शॉट कधी खेळायचा हे कोणालाच माहीत नाही अशा शब्दांत संताप व्यक्त करताना गॅरी कर्स्टन यांनी एकाप्रकारे चेतावणीही दिली. या क्षेत्रात सुधारणा करणाऱ्या खेळाडूंचा संघात समावेश केला जाईल; अन्यथा, त्यांना वगळलं जाईल असा इशारा त्यांनी दिल्याचंही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. 

गॅरी कर्स्टन आपल्या शांत आणि अबोल स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामळे त्यांनी इतका संताप व्यक्त करणं थोडं आश्चर्यकारकच आहे. दरम्यान यावरुन पाकिस्तान संघ किती अडचणीत आहे याचीही कल्पना येत आहे.