लॉर्डस: बांगलादेशविरुद्धच्या निर्णायक सामन्यात अपेक्षित धावसंख्या न उभारता आल्यामुळे पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला किमान ३५० धावा करण्याबरोबरच बांगलादेशचा संपूर्ण संघ ७ धावांमध्ये बाद करण्याची गरज होती. मात्र, हे अशक्यप्राय आव्हान पाकिस्तानला पूर्ण करता आले नाही. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३१५ धावांपर्यंतच मजल मारली. त्यामुळे आजचा सामना जिंकला तरी सरासरी धावसंख्येच्या गणितानुसार पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यासाठी अशक्य समीकरणांची जुळवाजुळव करावी लागणार होती. यापैकी पहिल्या समीकरणानुसार पाकला ५० षटकांत किमान ३५० धावा करून बांगलादेशचा डाव ३९ धावांमध्ये गुंडाळावा लागणार होता. तर दुसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानला ५० षटकांमध्ये ४०० धावा कराव्या लागणार होत्या आणि बांगलादेशचा डाव ८४ धावांमध्ये गुंडाळावा लागणार होता. तर तिसऱ्या समीकरणानुसार पाकिस्तानला ४५० धावा करून बांगलादेशला १२९ धावांवर गुंडाळावे लागणार होते. त्यामुळे पाकिस्तानची विश्वचषकातील एक्झिट जवळपास निश्चित मानली जात होती.
मात्र, पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदने या सामन्यापूर्वी आम्ही ५०० धावांचा डोंगर उभारू अशा वल्गना केल्या होत्या. आजच्या सामन्यानंतर तो अपेक्षेप्रमाणे तोंडघशी पडला.
पाकिस्तानने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इमाम उल-हक, बाबर आझम आणि इमाद वासिम या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्तानने ३१५ धावांपर्यंत मजल मारली. बाबरने अर्धशतकी खेळी करून नवा विक्रमाला गवसणी घातली. विश्वचषक स्पर्धेच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला. यापूर्वी हा विक्रम जावेद मियादाँद यांच्या नावावर होता.