'पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत पाकिस्तानला सर्वोत्तम बनवणार' इम्रान खान यांचा पण

नुकत्याच झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली.

Updated: Jul 22, 2019, 11:09 PM IST
'पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत पाकिस्तानला सर्वोत्तम बनवणार' इम्रान खान यांचा पण title=

वॉशिंग्टन : नुकत्याच झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक झाली. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येही पाकिस्तानला पोहोचता आलं नाही. यामुळे पाकिस्तानच्या टीमवर कठोर शब्दांमध्ये टीका करण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी क्रिकेट बोर्डामध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी केली होती. यानंतर आता इम्रान खान यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत पाकिस्तानला सर्वोत्तम टीम बनवू, असा पण इम्रान खान यांनी केला आहे.

'पाकिस्तानच्या टीममध्ये मी सुधारणा करणार आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतर मी हा निर्णय घेतला. वर्ल्ड कपमधली पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक होती. पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत पाकिस्तानची टीम सर्वोत्कृष्ट होईल, अशी अपेक्षा आहे,' असं इम्रान खान म्हणाले. अमेरिका दौऱ्यावर असलेले इम्रान खान पाकिस्तानी मूळ असलेल्या अमेरिकेच्या नागरिकांशी बोलत होते. पाकिस्तानचे पंतप्रधान हे त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाचे संरक्षक असतात. १९९२ सालच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने इम्रान खान यांच्या नेतृत्वात एकमेव वर्ल्ड कप जिंकला होता.

सरफराज अहमदच्या नेतृत्वात खेळलेली पाकिस्तानची टीम वर्ल्ड कपमध्ये पाचव्या क्रमांकावर राहिली. या स्पर्धेतल्या ९ पैकी ५ मॅच पाकिस्तानला जिंकता आल्या. खराब नेट रनरेटमुळे समान पॉईंट असूनही पाकिस्तानऐवजी न्यूझीलंडच्या टीमला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळाला.

वर्ल्ड कपमधल्या खराब कामगिरीची समिक्षा केली जाईल असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं होतं. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची अजून बैठक झालेली नाही.