विनेश फोगाट केस का हरली? क्रीडा लवादाने सांगितलं कारण... म्हणून पदक देता आलं नाही

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला 100 ग्रॅम वजन वाढल्याने अपात्र ठरवण्यात आलं होतं. विनेशने 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. पण वजनामुळे तिला पदक गमवावं लागलं. या विरोधात तीने क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती.  

राजीव कासले | Updated: Aug 19, 2024, 10:38 PM IST
विनेश फोगाट केस का हरली? क्रीडा लवादाने सांगितलं कारण... म्हणून पदक देता आलं नाही title=

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवल्याप्रकरणी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) क्रीडा लवादाकडे (CAS) दाद मागितली होती. पण तिची याचिका क्रीडा लवादाने फेटाळून लागली. त्यामुळे पदक मिळवण्याची तिची शेवटची आशाी संपुष्टात आली. आता क्रीडा लवादाच्या निर्णयाची प्रत समोर आली आहे, ज्यात विनेशची याचिका का फेटाळण्यात आली याचं कारण देण्यात आलं आहे. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट (Court of Arbitration for Sport) अर्थात क्रीडा लवादाने यात स्पष्ट केलं आहे, अॅथलीटचं वजन निर्धारित केलेल्या वजना पेक्षा जास्त नको, आणि यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

विनेश फोगाटची याचिका का फेटाळली?
क्रीडा लवादाच्या अहवालात विनेश फोगाटची याचिका का फेटाळण्यात आली याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 'ऑलिम्पिक संघटनेच्या नियमात खेळाडूचं वजन किती असावं याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. हे नियम प्रत्येक खेळाडूसाठी बंधनकारक आहेत. निर्धारित केलेल्या वजनापेक्षा जास्त वजन नियमात बसणारं नाही. यात थोडीशीही सूट नाही, विनेश फोगाटचं वजन 50 किलो पेक्षा जास्त होतं, याचे पुरावे देखाली देण्यात आले' असं क्रीडा लवादाच्या अहवालात सांगण्यात आलेलं आहे. विनेश फोगाटचं वजन 100 ग्राम जास्त होतं, आणि इतक्या कमी वजनासाठी खेळाडूला सूट मिळायला हवी असं विनेश फोगाटने आपल्या याचिकेत म्हटलं होतं. पण वजन नियंत्रणात ठेवणं ही खेळाडूची जबाबदारी असल्याचं क्रीडा लवादाने आपल्या अहवालात स्पष्ट केलं आहे. 

विनेश फोगाटने आपल्या याचिकेत क्युबाची महिला कुस्तीपटू युसनेलिस गुजमॅन लोपेझ हिच्याबरोबर संयुक्तरित्या रौप्य पदक दिलं जावं असं म्हटलं होतं. क्युबाची कुस्तीपटू लोपेझ हिचा सेमीफायनलमध्ये पराभव करत विनेशने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण विनेशला अपात्र ठरवल्यानंतर लोपेझला अंतिम फेरी खेळण्याची संधी देण्यात आली. पण  50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अमेरिकेची महिला कुस्तीपटू सारा एन हिल्डेब्रांट हिने सुवर्ण पदक पटकावलं. तर क्युबाच्या लोपेशला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

विनेशचं वजन कसं वाढलं?
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 6 ऑगस्टला झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात विनेश फोगाटने दमदार कामगिरी करत आपलं पदक निश्चित केलं. पम अंतिम फेरीच्या आधी विनेशचं वजन जवळपास तीन किलोने वाढलेलं आढळलं. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी विनेशने रात्रभर कठोर प्रयत्न केले. ट्रेनिंगशिवाय व्यायाम, सोना सेशन केलं. इतकंच नाही तर तीने आपल्या शरीरातून रक्तही काढलं, शिवाय केसही कापले. पण यानंतरही तिचं वजन 100 ग्रॅम जास्त होतं.