कुस्तीपटू विनेश फोगाट बेशुद्ध, पॅरिसच्या रुग्णालयात दाखल... जाणून घ्या Health Update

Vinesh Phogat Medical Bulletin : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट बेशुद्ध पडली. तिला पॅरिसच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डिहायड्रेशनमुळे विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 7, 2024, 02:44 PM IST
कुस्तीपटू विनेश फोगाट बेशुद्ध, पॅरिसच्या रुग्णालयात दाखल... जाणून घ्या Health Update title=

Vinesh Phogat disqualified Paris Olympic 2024 : भारताच्या मिशन ऑलिम्पिकला (Mission Olympic) मोठा धक्का बसलाय. विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरलीय. विनेश फोगाट (Vinesh Phogat) 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलंय. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावं लागतं. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येतंय. 

विनेश फोगाट हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली होती. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला होता. विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र अंतिम सामन्याआधीच तिला अपात्र ठरवण्यात आलंय. 

विनेश फोगाट बेशुद्ध
अपात्र ठरल्यानंतर आता विनेश बेशुद्ध झाल्याचं समोर आलं आहे. विनेशला पॅरिसच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिला IV फ्लुइड देण्याची शिफारस करण्यात आली आहे. डिहायड्रेशनमुळे विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार विनेश आता ऑलिम्पक व्हिलेजच्या पॉलिक्लिनिकमध्ये आहे. तिची तब्येत आता स्थिर असल्याचं तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान भारतीय पथकाकडे अपात्रतेविरोधात अपील करण्याचा कोणताही पर्याय नाही.

भारतात संतप्त प्रतिक्रिया
विनेश फोगाटकडून करोडो भारतीयांना पदकाची अपेक्षा होती. पण सुवर्णपदकासाठी खेळायला काही तासांचा अवधी असतानाच विनेशला अपात्र ठरवण्यात आलं. याचे पडसाद भारतीय क्रीडा चाहत्यांमध्ये उमटले. क्रीडा चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केलं आहे. आपल्या पोस्टमध्ये मोदींनी म्हटलंय 'विनेश तू चॅम्पियनमध्ये चॅम्पियन आहेस. तू भारताचा गौरव असून करोडो भारतीसांठी प्रेरणास्थान आहेस. आजची घटनेवर मी जे अनुभवतोय ते शब्दात व्यक्त करणं कठिण आहे. आव्हानांचा सामना करणं हा तुझा स्वभाव आहे. आम्ही सर्व तुझ्यासाठी प्रार्थना करतोय' असं मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.

IOA ची प्रतिक्रिया
विनेश फोगाट 50 किलो फ्रिस्टाईल वजनी गटात खेळत होती. अंतिम फेरीच्याआधी तिचं वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढल्याने तिला अपात्र जाहीर केल्याचं ऑलिम्पिक असोसिएशनने म्हटलं आहे. रात्रभर वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतरही सकाळी करण्यात आलेल्या तपासणीत विनेशचं वजन 100 ग्रॅम जास्त होतं.