Vinesh Phogat Disqualified in Olympics: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) भारताला मोठा धक्का बसला आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat ) भारताला पहिलं सुवर्णपदक (Gold Medal) जिंकून देईल अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच तिला अपात्र घोषित कऱण्यात आलं आहे. विनेश फोगाट आज 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकासाठी मैदानात उतरणार होती. पण आज तिचं वजन करण्यात आलं असता 100 ग्रॅम वजन जास्त भरलं. यानंतर तिला अपात्र जाहीर करण्यात आलं.
दरम्यान एक दिवस आधी सामना खेळलेल्या विनेश फोगाटचं वजन योग्य असताना दुसऱ्या दिवशी लगेच तिला अपात्र कसं काय जाहीर केलं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशात कुस्तीमध्ये वजनासंबंधी काय नियम आहे हे समजून घेऊयात. यावरुन तुम्हाला विनेश फोगाटला अपात्र घोषित का केलं आहे याबद्दल समजेल.
ऑलिम्पिकमधील कुस्तीपटूंच्या वजनाबाबतच्या नियमांनुसार, सामन्यापूर्वी कुस्तीपटूंचे वजन केले जाते आणि जर दोन पैलवान दोन दिवस लढत लढले तर त्यांचे दोन दिवस वजन केले जाते. नियमानुसार, सामना असलेल्या दिवशी सकाळी प्रत्येक कुस्तीपटूचे वजन केलं जातं.
प्रत्येक वजन वर्गासाठी स्पर्धा दोन दिवसांच्या कालावधीत लढवली जाते. त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या कोणत्याही कुस्तीपटूचं दोन दिवस वजन केलं जातं. पहिल्या वजनाच्या वेळी, कुस्तीपटूंना योग्य वजन असावं यासाठी 30 मिनिटे दिली जातात. तुम्ही 30 मिनिटांत अनेक वेळा वजन करू शकता. पण दुसऱ्या दिवशी फक्त 15 मिनिटे असतात.
वजन केल्यानंतर खेळाडूंच्या आरोग्याची तपासणी केली जाते. त्यांनी नखं कापली आहेत की नाही हे पाहिलं जातं. या वजनादरम्यान, कुस्तीपटूला फक्त सिंगलेट घालण्याची परवानगी आहे. यानंतर, दुसऱ्या दिवशी चाचणी घेतली जाते. दुसऱ्या दिवशी 15 मिनिटं वजन मोजलं जातं. विनेशच्या प्रकरणात तिचं वजन एका दिवसात 100 ग्रॅमने वाढले, त्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आलं.
यूडब्ल्यूडब्ल्यूच्या (United World Wrestling) नियमांनुसार, जर एखादा खेळाडू वजन मोजण्यात सहभागी झाला नाही आणि अपयशी झाला तर त्याला स्पर्धेतून बाहेर काढलं जातं. तसंच कोणत्याही रँकशिवाय शेवटचं स्थान दिलं जातं. अशा स्थितीत त्याला रौप्यपदकही मिळत नाही.