दुबई : २०२० सालच्या आयपीएलला १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमातील चॅम्पियन मुंबई इंडियन्स यंदाही तशीच कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरेल. नेहमीप्रमाणेच यावेळीही मुंबईच्या टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक ओपनर म्हणून मुंबईची ताकद आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा क्रिस लिनही गरज पडली तर ओपनिंगसाठी पर्याय आहे. दुसरीकडे सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यासारखे बॅट्समन मधली फळी तगडी बनवण्यात मदत करतील.
दुसऱ्या टीमच्या तुलनेत मुंबईचा पगडा थोडा भारी असेल. पण लसिथ मलिंगाची अनुपस्थिती आणि चांगल्या स्पिनरची कमी मुंबईसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे टीममध्ये योग्य बॉलर्सचं संयोजन करणं रोहित शर्मापुढे आव्हान असेल.
लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारण सांगून यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे मलिंगाच्या गैरहजेरीत जसप्रीत बुमराहवर जास्त दबाव असेल. मागच्या मोसमात टीमसाठी सर्वाधिक १९ विकेट घेणारा बुमराह बराच काळ दुखापतीमुळे क्रिकेटपासून लांब आहे.
परदेशी फास्ट बॉलरमध्ये मुंबईकडे ट्रेन्ट बोल्ट आणि मिचेल मॅकलॅनघन डावखुऱ्या बॉलरचा पर्याय आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कुल्टर नाईलचा फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर म्हणूनही वापर केला जाऊ शकतो. मलिंगाच्याऐवजी ऑस्ट्रेलियाचा जेम्स पॅटिनसन टीममध्ये आला आहे. धवल कुलकर्णीलाही मुंबईने टीममध्ये सामील केलं आहे, त्यामुळे फास्ट बॉलरसाठी मुंबईकडे बरेच पर्याय आहेत.
यासोबतच मुंबईकडे हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड हे फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर आहेत. कायरन पोलार्डने नुकत्याच संपलेल्या कॅरेबियन प्रिमियर लीग (सीपीएल)मध्ये उल्लेखनीय बॉलिंग केली आहे. सीपीएल फायनलमध्ये पोलार्डने चार विकेट घेऊन ट्रिनबागो नाईट रायडर्सला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण आयपीएलच्या मागच्या काही सत्रांमध्ये मात्र पोलार्डने फार बॉलिंग केली नाही. मागच्या १० वर्षांपासून मुंबईकडून खेळताना ३३ वर्षांच्या पोलार्डने १४६.७७ च्या स्ट्राईक रेटने २,७५५ रन केले आहेत. पोलार्डने आयपीएलमध्ये १७६ सिक्सही लगावले आहेत. मुंबईकडून सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्डही पोलार्डच्याच नावावर आहे.
आतापर्यंत सर्वाधिक ४ वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबईकडे यंदा चांगल्या स्पिनरची कमतरता आहे. मुंबईकडे काम चलाऊ स्पिनर म्हणून कृणाल पांड्या आहे, तर मागच्या मोसमात चांगली कामगिरी करणारा लेग स्पिनर राहुल चहर यंदाही तशीच कामगिरी करेल, अशी मुंबईची अपेक्षा असेल. ऑफ स्पिनर जयंत यादवसाठी मागचा स्थानिक मोसम चांगला गेला नाही, पण जयंत यादवला संधी मिळण्याची शक्यताही कमी आहे.
युएईमध्ये संथ खेळपट्ट्या स्पिनरसाठी अनुकूल असताना मुंबईकडे चांगल्या स्पिनरची कमतरता मुंबईसाठी चिंतेची बाब ठरू शकते.
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, क्विंटन डिकॉक, मिचल मॅकलॅनघन, जसप्रीत बुमराह, जेम्स पॅटिनसन, कृणाल पांड्या, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंग, राहुल चहर, इशान किशन, अनुकूल रॉय, आदित्य तरे, जयंत यादव, ट्रेन्ट बोल्ट, धवल कुलकर्णी, शरफेन रदरफोर्ड, क्रिस लीन, नॅथन कुल्टर नाईल, सौरभ तिवारी, मोहसीन खान, दिग्विजय देशमुख, प्रिन्स बलवंत राय