एकही मॅच न खेळलेला खेळाडू टी-२० वर्ल्ड कपसाठी 'सरप्राईज पॅकेज', विराटचे संकेत

ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी भारताची तयारी सुरु झाली आहे.

Updated: Jan 9, 2020, 11:03 AM IST
एकही मॅच न खेळलेला खेळाडू टी-२० वर्ल्ड कपसाठी 'सरप्राईज पॅकेज', विराटचे संकेत title=

इंदूर : ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी भारताची तयारी सुरु झाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा ७ विकेटने दणदणीत विजय झाला. श्रीलंकेने दिलेलं १४३ रनचं आव्हान भारताने १५ बॉल शिल्लक असताना पूर्ण केलं. भारताच्या फास्ट बॉलरनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारताचा विजय सोपा झाला. शार्दुल ठाकूरने ३ विकेट, नवदीप सैनीने २ विकेट आणि जसप्रीत बुमराहने १ विकेट घेतली.

४ ओव्हरमध्ये १८ रन देऊन २ विकेट घेणाऱ्या नवदीप सैनीला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं. मॅच संपल्यानंतर बोलताना कर्णधार विराट कोहलीने भारताच्या फास्ट बॉलरच्या कामगिरीचं कौतुक केलं. टी-२० वर्ल्ड कपमध्ये कर्नाटकचा फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णा सरप्राईज पॅकेज असू शकेल, असे संकेत विराटने दिले. प्रसिद्ध कृष्णा हा आयपीएलमध्ये कोलकात्याच्या टीमकडून खेळतो.

'नवदीप वनडे आणि टी-२०मध्ये चांगली कामगिरी करत आहे. तो जलद बॉलिंग करु शकतो. यॉर्कर आणि बाऊन्सरवर तो विकेट घेत आहे. टीमसाठी ही चांगली गोष्ट आहे. बुमराहच्या पुनरागमनामुळेही मी समाधानी आहे,' असं विराटने सांगितलं.

'ऑस्ट्रेलियामध्ये प्रसिद्ध कृष्णा सरप्राईज पॅकेज असू शकेल. कृष्णा जलद बॉलिंग टाकतो तसंच त्याच्या बॉलला उसळीदेखील मिळते. स्थानिक क्रिकेटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. वर्ल्ड कपसाठी आमच्याकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत,' अशी प्रतिक्रिया विराटने दिली.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये भारताच्या बॅट्समननी श्रीलंकेच्या आव्हानाचा सहज पाठलाग केला. राहुलने ३२ बॉलमध्ये ४५ रन तर शिखर धवनने २९ बॉलमध्ये ३२ रन केले. श्रेयस अय्यरने २६ बॉलमध्ये ३४ रनची खेळी केली, तर विराट १७ बॉलमध्ये ३० रनवर नाबाद राहिला. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये टीमने केलेल्या या कामगिरीवर विराटने आनंद व्यक्त केला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसरी टी-२० मॅच शुक्रवारी पुण्यात खेळवण्यात येईल. ३ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये भारत १-०ने आघाडीवर आहे. गुवाहाटीतील पहिली टी-२० मॅच पावसामुळे रद्द झाली होती.