पृथ्वी शॉचा वडिलांसाठी भावनिक संदेश

१८ वर्षांच्या पृथ्वी शॉनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

Updated: Oct 29, 2018, 08:02 PM IST
पृथ्वी शॉचा वडिलांसाठी भावनिक संदेश title=

मुंबई : १८ वर्षांच्या पृथ्वी शॉनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच टेस्ट मॅचच्या पहिल्याच इनिंगमध्ये पृथ्वी शॉनं शतक साजरं केलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये शॉनं २३७ रन केले. याचवर्षी पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारतानं न्यूझीलंडमध्ये अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला. यानंतर शॉला आयपीएलमध्ये दिल्लीच्या टीमनं विकत घेतलं. जानेवारी २०१७ मध्ये शॉनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. इंग्लंड दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्येही शॉची निवड झाली होती. पण त्याला संधी मिळाली नाही.

एका परीकथेप्रमाणे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉला वैयक्तिक आयुष्यात मात्र संघर्ष करावा लागला होता. जेव्हा पृथ्वी ४ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आईचं निधन झालं. यानंतर पृथ्वीचे वडिल पंकज शॉ यांनी त्याचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पृथ्वीनं एका इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून वडिलांनी केलेलं मार्गदर्शन आणि मेहनतीचे आभार मानले आहेत.

पृथ्वीनं वडिलांसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जेव्हा मी संघर्ष करत असतो तेव्हा त्यांना माहिती असतं. तू पुढे जा, मी तुझ्या पाठीशी आहे, असं ते म्हणतात. या शब्दांमुळेच मी साहसी झालो आहे, असं पृथ्वी शॉ या पोस्टमध्ये म्हणाला आहे.

वर्षभरातल्या शानदार कामगिरीमुळे पृथ्वी शॉची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजसाठी निवड झाली आहे. भारत ऑस्ट्रेलियामध्ये ४ टेस्ट मॅच खेळणार आहे. ही टेस्ट सीरिज डिसेंबरपासून सुरू होणार आहे.