गेल्या वर्षी पाटणा संघाने पलटणला दुसऱ्या लढतीत बरोबरीत रोखले होते. त्यापूर्वी पहिल्या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या वेळी पलटणने तशीच सुरुवात करताना पहिल्या लढतीत पाटणा पायरट्स संघाला निष्प्रभ केले. चढाईपटू अस्लम इनामदार, मोहित गोयत आपली जबाबदारी चोख बजावत असताना त्यांना बचावपटूंकडून सुरेख साथ मिळत होती. एकूणच सर्वोत्तम सांघिक खेळाच्या जोरावर पलटण संघाने सलग दुसऱ्या सामन्यात एकतर्फी विजय मिळविला. पाटणा पायरट्सकडून अंकितची अष्टपैलू कामगिरी संघाला वाचवू शकली नाही. देवांकने चढाईत बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला. पुणेरी पलटण संघाकडून गौरव खत्री आणि अमन या दोन्ही कोपरारक्षकांनी हाय फाईव्ह करताना प्रत्येकी सहा गुणांची कमाई केली. अस्लमने ९, तर मोहितने ८ गुण नोंदवले.
पूर्वार्धातच पुणेरी पलटण संघाने २०-१० अशी १० गुणांची मोठी आघाडी घेत आपली बाजू भक्कम केली होती. पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही पुणेरी पलटणला चढाईपटूंबरोबर बचावपटूंची तगडी साथ सुरुवातीपासूनच मिळाली. पूर्वार्धातच डावा कोपरारक्षक अमनने हाय फाईव्ह करुन आपला दरारा निर्माण केला होता. चढाईत अस्लम इनामदार आणि मोहित गोयत यांनी आपली जबाबदारी चोख पाडली.
चढाईच्या खेळापेक्षाही बचावाच्या आघाडीवर आलेले अपयश पाटणा पायरट्ससाठी चिंताजनक ठरले. दुसरीकडे पुणेरी पलटणने अष्टपैलू खेळ दाखवून दिला. चढाईत मिळविलेले १५ आणि बचावातील २० गुण पुणेरी पलटणचे वर्चस्व सिद्ध करतात. दोन्ही सत्रात पलटणने एकेक लोणही चढवला.