सिंधूचा इतिहास! जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच सुवर्ण पदक

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे भारताचं स्वप्न साकार झालं आहे.

Updated: Aug 25, 2019, 06:39 PM IST
सिंधूचा इतिहास! जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच सुवर्ण पदक

मुंबई : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे भारताचं स्वप्न साकार झालं आहे. भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने इतिहास घडवला आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये सिंधूने जपानच्या ओकुहाराला पराभूत केलं, आणि सुवर्ण पदक पटकावलं. या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारी सिंधू पहिली भारतीय ठरली आहे.

जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या सिंधूने चौथ्या क्रमांकाच्या नोजोमी ओकुहाराला २१-७ आणि २१-७ अशा सेटमध्ये मात दिली. ही मॅच ३७ मिनिटं चालली. या विजयासोबतच सिंधूने ओकुहाराविरुद्धचं तिचं कारकिर्दीतलं रेकॉर्ड ९-७ असं केलं आहे.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये सिंधूने तिसऱ्यांदा धडक मारली होती. या स्पर्धेत सिंधूनं यापूर्वी दोन रौप्य आणि दोन ब्राँझ पदकं पटकावली आहेत. २०१७ आणि २०१८ साली सिंधूला रौप्य आणि २०१३ आणि २०१४ साली सिंधूला ब्राँझ पदक मिळालं होतं.

२०१९ जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये सिंधूने चांगली सुरुवात केली. सुरुवातीलाच सिंधूने ५-१ने आघाडी घेतली. यानंतर तिची आघाडी १२-२पर्यंत पोहोचली. यानंतर सिंधूने मागे वळून पाहिलं नाही. १६-२ने आघाडी घेतल्यानंतर सिंधूने २१-७ असा पहिला गेम जिंकला. सिंधूने १६व्या मिनिटाला पहिला गेम आपल्या नावावर केला.

दुसऱ्या गेममध्ये सिंधूने २-०ने आघाडी घेतली. यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये तिने ८-२ची आघाडी कायम ठेवली. पुढेही आक्रमक खेळ करत सिंधूने दुसरा गेमही २१-७ने खिशात टाकला.