VIDEO : 'आधी तिला समजवून सांग'; सामन्यादरम्यानच पीव्ही सिंधूचे 'बेस्ट फ्रेंड'सोबत भांडण

Denmark Open : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा डेन्मार्क ओपन सुपर 750 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कॅरोलिना मरिनकडून पराभव झाला. मात्र या सामन्यादरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 22, 2023, 02:03 PM IST
VIDEO : 'आधी तिला समजवून सांग'; सामन्यादरम्यानच पीव्ही सिंधूचे 'बेस्ट फ्रेंड'सोबत भांडण title=

भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचे (PV Sindhu) डेन्मार्क ओपन 2023 च्या (Denmark Open) अंतिम फेरीत स्थान हुकलं आहे. दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती आणि माजी जगज्जेती पीव्ही सिंधू शनिवारी ओडेन्समधील ज्यस्के बँक एरिना येथे महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत रिओ 2016 ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मारिनकडून (Carolina Marin) पराभूत झाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडली. मात्र या सामन्यादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे सध्या ही मॅच फार चर्चेत आहे. सामन्यादरम्यान पीव्ही सिंधूचा तिच्या 'बेस्ट फ्रेंड'सोबत जोरदार वाद झाला.

पीव्ही सिंधूचा डेन्मार्क ओपन सुपर 750 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव झाला. पीव्ही सिंधू तिची कट्टर प्रतिस्पर्धी आणि जवळची मैत्रीण स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिच्याकडून हरली. हा सामना एक तास 13 मिनिटे चालला ज्यामध्ये सिंधूला 18-21, 21-19, 7-21 असा पराभव स्वीकारावा लागला. सिंधूला स्पेनच्या कॅरोलिना मारिनने तीन गेममध्ये पराभूत केले. मात्र या सामन्यादरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दोघांच्या भांडणानंतर रेफरीने दोघांनाही यलो कार्ड दिलं.

या सामन्यादरम्यान सिंधू आणि मारिनमध्ये भांडण झाले ज्यासाठी दोघांना यलो कार्ड देण्यात आले. पीव्ही सिंधूने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या सुपानिदा कातेथोंगचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. सिंधूने गेल्या आठवड्यात फिनलंडमध्ये आर्क्टिक ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. मात्र या सामन्यात पराभव झाल्यामुळे स्पर्धेत ती पुढे जाऊ शकली नाही. मारिनकडून सिंधूचा हा सलग पाचवा पराभव आहे. 2016 मधील रिओ ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत आणि 2018 मधील वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या विजेतेपदाच्या सामन्यातही या मारिनने तिचा पराभव केला होता.

नेमकं काय घडलं?

अंपायरने दोघांनाही अनेक वेळा ताकीद दिली आणि शेवटी त्यांना यलो कार्ड दाखवावे लागले. पंचांनी मारिनला पॉईंट मिळाल्यावर सेलिब्रेट करण्याची पद्धत बदलण्यास सांगितले. यानंतरही मारिनने ओरडणे आणि आनंदोत्सव साजरा करणे सुरूच ठेवले, तर सिंधूला सर्व्ह करण्यास उशीर झाल्याबद्दल दोनदा ताकीद देण्यात आली.

निर्णायक गेममध्ये, अंपायरने सिंधूला त्वरीत सर्व्हिस करण्यास तयार नसल्याबद्दल इशारा दिला. यावर सिंधू अंपायरला म्हणाली की, “तू तिला जोरात ओरडण्याची परवानगी दिली आहेस, आधी तिला समजावून सांग मग मी तयार होईन.” यानंतर काही वेळातच शटल सिंधूच्या कोर्टात पडली आणि दोघांनीही त्याला मारायला सुरुवात केली. तिथेही दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर अंपायरने दोन्ही खेळाडूंना बोलावून यलो कार्ड दाखवले आणि मारिनला सिंधूच्या दिशेने पडलेली शटल उचलू नका असे सांगितले.

12व्या मानांकित पीव्ही सिंधू आणि सहाव्या मानांकित स्पेनच्या कॅरोलिना मारिन यांच्यातील पहिला सामना अतिशय रोमांचक होता. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येक गुणासाठी एकमेकांना कडवी टक्कर दिली. सिंधूने लवकर आघाडी घेतली. पण कॅरोलिनानेही लगेचच 7-5 अशी आघाडी घेतली. यानंतर सिंधूने स्मॅश करत गुणसंख्या 10-10 अशी बरोबरी केली. दोन्ही खेळाडूंनी गेममध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न केला आणि अनेक वेळा स्कोअर बरोबरीत आणला, पण शेवटी मारिनने सिंधूचा पराभव करत पहिला गेम 21-18 असा जिंकला.

पीव्ही सिंधूने दुसऱ्या गेमला आक्रमक सुरुवात केली. सुरुवातीला तिने गेममध्ये सात गुणांची मोठी आघाडी घेतली आणि स्कोअर 10-3 असा केला. मारिनने पुनरागमन करत स्कोअरमध्ये बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला पण तिला यश मिळू शकले नाही. सिंधूने हा गेम 21-19 असा जिंकला.

त्यानंतर कॅरोलिनाने तिसऱ्या गेममध्ये शानदार पुनरागमन केले. ब्रेकमध्ये मरिनाने 9 गुणांची मोठी आघाडी घेत स्कोअर 11-2 असा नेला. यावेळी सिंधूला गुण मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आपली आघाडी कायम ठेवत कॅरोलिनाने निर्णायक गेम 21-7 असा जिंकला.