सिंधूला कोरिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद

भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिजच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलेय. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Oct 23, 2017, 02:21 PM IST
सिंधूला कोरिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद title=

सेऊल : भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिजच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलेय. 

तिने फायनलमध्ये जपानच्या नोझोमी ओकुहारावर २२-२०, ११-२१, २१-१८ अशी मात करत जेतेपद उंचावले. या विजयासह सिंधूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला. या सीरिजचे जेतेपद पटकावणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरलीये. 

सिंधूचे हे तिसरे सुपर सीरिज जेतेपद आहे. पहिल्या गेममध्ये सिंधू आणि नोझोमीमध्ये चांगलीच चुरस रंगली होती. १८-२० अशा पिछाडीवर असताना सिंधूने २०-२० अशी बरोबरी साधली. त्यानंतर सलग दोन पॉईंट जिंकत सिंधूने पहिल्या गेम आपल्या नावे केला.

दुसऱ्या गेममध्ये नोझोमीने सिंधूपेक्षा सरस खेळ केला आणि गेममध्ये वर्चस्व कायम ठेवले. दुसरा गेम सिंधूने ११-२१ असा गमावला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधू आणि नोझोमी पुन्हा एकाहून एक सरस खेळ करत होत्या. या गेममध्ये तब्बल ५६ शॉट्सपर्यंत रॅली रंगल्या होत्या. मात्र शेवटच्या क्षणी सिंधूने गेम उंचावला आणि तिसऱ्या गेममध्ये बाजी मारत जेतेपद पटकावले.