नवी दिल्ली : प्रख्यात इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी भारतीय क्रिकेटला जोरदार हादरा दिलाय. BCCIच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या व्यवस्थापकीय समितीमधून गुहा यांनी राजीनामा दिला. समितीकडे दिलेल्या आपल्या राजीनामापत्रात त्यांनी भारतीय क्रिकेटमधल्या अनेक गैरप्रकारांना वाचा फोडलीये. कर्णधार विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यामधला वाद बीसीसीआयनं अतिशय ढिसाळ पद्धतीनं हाताळल्याचं गुहा यांनी लिहिलंय...
जर कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकांचं पटत नव्हतं, तर हा विषय मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाची मालिका संपल्यानंतर लगेच का हाताळला गेला नाही? अखेरच्या क्षणापर्यंत, महत्त्वाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा तोंडावर येईपर्यंत वाट पाहण्याचं कारण काय? यामुळे प्रशिक्षक, कर्णधार आणि संघाचं मनोबल खच्ची होण्याची शक्यता दिसली नाही का?
प्रशिक्षकाच्या निवडीमध्ये विराट कोहलीचं मत ग्राह्य धरलं जात असल्याबद्दल गुहा यांनी कुणाचंही नाव न घेता जोरदार टीका केलीये. आपल्याला प्रशिक्षकाच्या निवडीमध्ये नकाराधिकार आहे, अशी संघातल्या ज्येष्ठ खेळाडूंची समजूत झालीये. जगभरात इतर कोणत्याही देशात कोणत्याही खेळामध्ये असा नकाराधिकार नाही.
गुहा एवढं बोलून थांबत नाहीत... ज्येष्ठ खेळाडूंच्या स्टारडममुळे भविष्यात निवड समिती, इतकंच नव्हे तर पदाधिकारी कोण असावं आणि कोण नसावं यासाठी त्यांचं मत ग्राह्य धरलं जाईल की काय, अशी भीती त्यांनी बोलून दाखवली... प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांना कोहलीवर टीका केल्यामुळे जवळजवळ वर्षभर कॉमेंट्रीबॉक्सच्या बाहेर रहावं लागलं होतं... याचा अप्रत्यक्ष उल्लेख करत गुहा लिहितात...
आजमितीस ज्येष्ठ खेळाडू समालोचकांच्या निवडीत आपला नकाराधिकार वापरतात. आता ते प्रशिक्षकांवर येणार असतील, तर यानंतर निवड समिती आणि पदाधिका-यांचा नंबर लागेल का?
भारताचा कदाचित सर्वाधिक लाड झालेला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावरही रामचंद्र गुहा यांनी टीका केलीये.
एम.एस. धोनीनं कसोटीमधून स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर तो तीन्ही प्रकारांत देशाचं प्रतिनिधीत्व करत नसताना त्याला A विभागात टाकण्यावर मी आक्षेप घेतला होता. यामुळे संपूर्णपणे चुकीचा संदेश गेलाय.
भारतीय अ संघाचा प्रशिक्षक असलेला राहुल द्रविड आणि फिल्डिंग कोच असलेला आर. श्रीधर यांचे आयपीएल संघांसोबत असलेले संबंध आणि त्यामुळे निर्माण होणारा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट गुहा यांनी आपल्या राजीनामापत्रात अधोरेखित केलाय...
बीसीसीआय काही राष्ट्रीय प्रशिक्षकांना विशेष वागणूक देत आहे. त्यांच्यासोबत 10 महिन्यांचा करार करण्यात येतो. जेणेकरून त्यांना 2 महिने IPLचे प्रशिक्षक किंवा मेंटर होता येईल.
द्रविड हा आयपीएलच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघासोबत तर श्रीधर किंग्ज इलेव्हन पंजाबसोबत करारबद्ध आहे. भारताचे ज्येष्ठतम क्रिकेटपटू सुनील गावस्करही गुहांच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत... गावस्कर यांची कंपनी प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रूप ही शिखर धवनची व्यवस्थापक आहे. त्याच वेळी गावस्कर स्वतः बीसीसीआयच्या समालोचकांच्या पॅनलवर आहेत. सामन्यादरम्यान शिखर धवनवर भाष्य करताना गावस्करांचा हितसंघर्ष प्रकर्षानं समोर येत असल्याचं गुहा यांनी दाखवून दिलंय...
राज्यांमधल्या क्रिकेट संघटनांमध्येही हा हितसंघर्ष पाझरला असल्याचं गुहा यांनी उदाहरणासह दाखवून दिलंय. बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष असलेला सौरव गांगुलीचं नाव न घेता त्यांनी ही गोष्ट दाखवून दिलीये...
राज्यांच्या क्रिकेट संघटनांमध्येही हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट पोहोचलाय. एक माजी प्रसिद्ध क्रिकेटपटू एका स्थानिक संघटनेचा अध्यक्ष असताना मीडियामध्ये खेळाडूंवर भाष्य करतो.
सुप्रीम कोर्टानं लोढ समितीची नेमणूक करून भारतीय क्रिकेटमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पहिलं पाऊल उचललंय. मात्र एका इतिहासकाराच्या या ऐतिहासिक पत्रामुळे क्रिकेट सुधारण्यासाठी आणखी बरंच काही करावं लागणार आहे...