ढाका: अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशीद खानच्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान कर्णधार ठरला आहे. अफगाणिस्तान सध्या बांगलादेशविरुद्ध चितगाव येथे कसोटी सामना खेळत आहे. यावेळी अफगाणिस्तानचा संघ राशीद खानच्या नेतृत्त्वाखाली मैदानात उतरला.
अफगाणिस्तानच्या संघाचा हा तिसरा कसोटी सामना आहे. यापूर्वी अफगाणिस्तान भारत आणि आयर्लंड यांच्याविरुद्ध कसोटी सामना खेळला होता. यापैकी पहिल्या सामन्यात भारताकडून अफगाणिस्तानला पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने आयर्लंडवर सात गडी राखून मात केली होती.
आजच्या सामन्यात राशीद खानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी सर्वात लहान कर्णधाराचा विक्रम झिम्बाम्ब्वेच्या ततेंदा तायबूच्या नावावर होता. त्याने २००४ साली श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात झिम्बाम्ब्वेचे नेतृत्त्व केले होते. त्यावेळी तायबूचे वय २० वर्ष ३५८ दिवस होते. मात्र, राशीद खानने अगदी थोड्या फरकाने तायबूचा हा विक्रम तोडला. राशीद खान गुरुवारी कर्णधार म्हणून मैदानात उतरला तेव्हा त्याचे वय २० वर्ष ३५० इतके होते.
याशिवाय, सर्वाधिक कमी वयात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होण्याचा मान नवाब पतौडी यांच्या नावावर आहे. त्यांनी १९६२ साली वयाच्या २१व्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्त्व केले होते.